मुंबई: राज्य सरकारच्या मिशन बिगिन अगेन या धोरणातंर्गत शुक्रवारपासून दुकाने आणि इतर उद्योगधंदे पुन्हा सुरु करण्यात आले. त्यानुसार मुंबईही अनलॉक होईल. पण येत्या १० दिवसांत मुंबईतील रुग्णांची संख्या वाढेल, असा अंदाज मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकणी यांनी व्यक्त केला. आगामी काळातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन कोविड १९ रुग्णांना बेड उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिकेने डॅशबोर्ड तयार केल्याचे काकणी यांनी सांगितले.या डॅशबोर्डवर कुठल्या रुग्णालयात किती बेड उपलब्ध आहेत, याची माहिती मिळेल. सोमवारपासून हा डॅशबोर्ड कार्यान्वित होईल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात २४ तासांत कोरोनाचे १३९ बळी, दिवसभरात २४३६ रुग्ण वाढले

काही दिवसांपूर्वीच महानगरपालिकेने खासगी रुग्णालयातील ८० टक्के बेड ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार खासगी रुग्णालयांतून इतर आजाराच्या रुग्णांना जसजसा डिस्चार्ज दिला जातोय तसतसे महानगपालिकेकडून या रुग्णालयांतील बेड ताब्यात घेतले जात आहेत. तसेच खासगी रुग्णालयांनी जादा बिलाची आकारणी केल्यास नागरिकांनी महानगरपालिकेकडे तक्रार करावी, असेही यावेळी अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकणी यांनी सांगितले.


देशातील कोरोनाचे २० टक्के रुग्ण एकट्या मुंबईत, तरीही चाचण्यांच्या संख्येत घट


मुंबई हा सध्या राज्यातील कोरोनाचा हॉटस्पॉट आहे. मात्र, गेल्या काही दिवसांत मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या आणि मृत्यूदर घटत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईत असलेले दररोज ६.६२ टक्के रुग्णवाढीचे प्रमाण आता ३.५० टक्क्यांवर आले आहे. 'हॉटस्पॉट' ठरलेल्या भायखळा, वरळी, धारावी परिसरांमध्ये रुग्णवाढीचा दर दहा टक्क्यांवरून १.६ ते २.४ टक्के इतका खाली आला आहे. विशेष म्हणजे, पालिकेच्या सहा विभाग कार्यालयांच्या हद्दीतही रुग्णवाढीचा दर तीन टक्क्यांपेक्षा खाली उतरला आहे.