मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी : कोविशील्डचा साठा उपलब्ध झाल्याने लसीकरण सुरु राहणार
कोविशील्डचा साठा उपलब्ध
मुंबई : आज रात्रीपर्यंत लससाठा उपलब्ध झाला तरच शासकीय आणि महानगरपालिका लसीकरण केंद्र (Vaccination Center) सुरु राहतील असे काल पालिकेने म्हटले होते. या पार्श्वभुमीवर मुंबईकरांसाठी (Mumbai) दिलासादायक बातमी समोर येतेय. लसीकरणासाठी शासकीय आणि महानगरपालिकेच्या कोविड लसीकरण केंद्र/रुग्णालयांमध्ये कोविशील्डचा साठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे सर्व शासकीय आणि महानगरपालिकेचे लसीकरण केंद्रं उद्या दुपारी 12 नंतर सुरू असतील असे पालिकेने म्हटलंय.
कोविड प्रतिबंध लसीचा मुंबईत उपलब्ध असलेला साठा काल जवळपास संपुष्टात आला आहे. यामुळे आज मुंबईतील 73 पैकी 40 खासगी लसीकरण केंद्रांवर लसीकरण होणार नाही असे पालिकेने म्हटले होते. तसेच तर उर्वरित 33 खासगी लसीकरण केंद्रांवरही मर्यादीत लससाठी उपलब्ध असल्याचे पालिकेने म्हटले होते.
आज दुसरी मात्रा घेण्यास पात्र असणाऱ्यानीच लसीकरणासाठी यावे, असे आवाहन पालिकेने केले होते. लससाठ्याचा ओघ वाढल्यानंतर लसीकरण मोहीम पूर्ववत सुरु होईल असेही त्यात म्हटले होते.
पालिका कार्यक्षेत्रात कोविड-19 प्रतिबंध लसीकरण मोहिमेतंर्गत महानगरपालिका, शासन यांच्यातर्फे 63 लसीकरण केंद्रे तर खासगी रुग्णालयात 73 अशी एकूण 136 लसीकरण केंद्रे आहेत. कोविड प्रतिबंध लसीचा साठा मर्यादित स्वरुपात प्राप्त होत असल्याने अधूनमधून काही केंद्रांवर लसीकरण तात्पुरते थांबवावे लागते. त्यातही दुसरा डोस घेणाऱ्यांना प्राधान्य द्यावे लागत असल्याने लसींचा साठा लक्षात घेवून पालिकेतर्फे तसे नियोजन केलं जातंय.
पालिकेकडे 25 एप्रिलपर्यंत एकूण 24 लाख 58 हजार 600 इतक्या लसी उपलब्ध झाल्या. पैकी, 24 लाख 10 हजार 860 लस उपयोगात आल्या. म्हणजेच 47 हजार 740 इतका लससाठा 28 एप्रिल 2021 दुपारी 2 वाजेपर्यंत लसीकरणानंतर संबधित केंद्रावर शिल्लक होता. लसीकरणाचा वेग लक्षात घेता हा लससाठा काल उपयोगात आणला गेला.