महाविकासआघाडीच्या काळात राज्यात दलितांवरील अत्याचार वाढले; रामदास आठवलेंचा आरोप
`महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यात दलित आणि बौद्धांवर अत्याचार वाढत आहेत`
देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई: महाविकासआघाडी सरकारच्या काळात राज्यात दलित आणि बौद्धांवरील हल्ल्यात वाढ झाल्याचा आरोप केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केला. याविरोधात रिपब्लिकन पक्षातर्फे ११ जुलै रोजी देशभरात आंदोलन करण्यात येईल, अशी घोषणाही आठवले यांनी केली. ते सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यावेळी आठवले यांनी म्हटले की, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यात दलित आणि बौद्धांवर अत्याचार वाढत आहेत. लॉकडाऊनच्या काळातही महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दलित तरुणांची हत्या आणि अनेकांची घरे जाळल्याचे प्रकार घडले आहेत. मात्र, राज्य सरकार या सगळ्याकडे अक्षम्य दुर्लक्ष करत आहे. बौद्ध आणि दलितांवरील अत्याचार वाढत असताना ते रोखण्यात महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरले आहे, अशी टीका आठवले यांनी केली.
याविरोधात आवाज उठवण्यासाठी येत्या ११ तारखेला रिपब्लिकन पक्षातर्फे राज्यभरात आंदोलन करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय आणि पोलीस ठाण्याच्या बाहेर रिपब्लिकन पक्षाच्यावतीने आंदोलन करण्यात येईल. हे निषेध आंदोलन फिजिकल डिस्टन्सचे नियम पाळून आणि मास्क घालून करण्याची सूचना रिपब्लिकन कार्यकर्त्यांना देण्यात आल्याचे आठवले यांनी सांगितले.