सत्तेच्या खेळात शेतकरी वाऱ्यावर, राज्यातील 9 लाख हेक्टरवरील पिकं पाण्यात
अस्मानी संकटानं शेतकरी पुरता हवालदिल, राज्यात मात्र सत्तेचा खेळ
Maharastra Politics : राज्यात एकीकडे सत्तेचा खेळ सुरूंय. तर दुसरीकडे बळीराजावर पुन्हा एकदा अस्मानी संकट ओढावलंय. राज्यभरात पावसानं कहर केलाय. अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून लाखो हेक्टरवरील पीक पाण्यात वाहून गेलंय.
आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार तब्बल 9 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. बहुतांश भागातील जमीन अक्षरश: खरडून निघालीय. त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान कसं भरून निघाणार हा गंभीर प्रश्न आहे.
मराठवाडा, विदर्भाला सर्वाधिक फटका
कृषी विभागाच्या अहवालानुसार पावसामुळे सर्वाधिक नुकसान मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात झालय. तिथं 2 लाख 97 हजार हेक्टरचं नुकसान झाल्याची प्राथमिक नोंद आहे. जवळपास एक हजार हेक्टरवरील जमीन खरडून गेलीय. यापाठोपाठ यवतमाळ जिल्ह्याला फटका बसला असून जिल्ह्यातील दीड लाख हेक्टर क्षेत्राचं नुकसान झालंय.
तर वर्ध्यात 1 लाख 31 हजार हेक्टर, नागपुरात 28 हजार हेक्टर, भंडाऱ्यात 19 हजार हेक्टर, हिंगोलीत 15 हजार 300 हेक्टर, गडचिरोलीत 12 हजार हेक्टर तर बुलडाण्यात 7 हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालंय. त्यामुळेच तातडीनं अधिवेशन घेऊन ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलीय.
अस्मानी संकटानं शेतकरी पुरता हवालदिल झालाय. तर दुसरीकडे राज्यात मात्र सत्तेचा खेळ सुरू आहे. अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. त्यामुळे जिल्ह्यांना पालकमंत्री नाहीत. त्यामुळे अशा गंभीर परिस्थितीत बळीराजानं दाद मागायची तरी कुठे हाच सवाल उपस्थित होतोय. मुख्यमंत्र्यांनी मात्र यावर सावध पवित्रा घेतलाय.
पावसामुळे शेतीचं अतोनात नुकसान झालंय. बळीराजा पुरता हवालदिल झालाय. 2015 च्या निकषानुसार नैसर्गिक आपत्तीत कोरडवाहू क्षेत्राला हेक्टरी 6 हजार 800 रुपयांची मदत देण्याच्या सूचना आहेत. मात्र नुकसानीचं चित्र पाहता ही मदत पुरेशी ठरणार नाही. त्यामुळे राजकीय पेचात अडकून न राहता बळीराजाला त्ताकाळ मदत मिळावी हीच अपेक्षा.