मुंबई : जमावबंदीला पुरेसं यश न मिळाल्यानं आज राज्य सरकारनं आणखी कठोर पावलं उचलत राज्यभरात संचारबंदी लागू केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज ही घोषणा केली. जिल्ह्यांच्या सीमाही सील करण्यात आल्या असून खाजगी वाहनांना वाहतुकीलाही बंदी घालण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा आणि जीवनावश्यक वस्तूंची दुकानं आणि वाहतूक मात्र सुरु राहील, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.


प्रवासासाठी निर्बंध


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अत्यावश्यक बाबींसाठी घराबाहेर पडल्यास खाजगी गाडी किंवा रिक्षात प्रवाशांनाही निर्बंध घातले आहेत. खाजगी गाडीमध्ये चालक आणि दोन व्यक्ती बसू शकतील, तसंच रिक्षामध्ये चालक आणि एक व्यक्तीच बसू शकेल.


कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जिल्हाबंदी


कोरोना जिथे अजून पोहचला नाही तिथे तो पसरू नये म्हणून जिल्हाबंदी करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यांच्या सीमा सील करण्यात येणार आहेत. संशयित रुग्णांपासून धोका आहे. त्यामुळे सर्वांनी काळजी घ्यायला हवी. क्वारंटाईन केलेल्या लोकांनी घरातच राहावे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्याशी संपर्क ठेवू नये असं आवाहनही त्यांनी केलं.


जीवनावश्यक वस्तुंची दुकानं आणि वाहतूक सुरु राहणार


संचारबंदीच्या काळात कारखाने, दुकानं, कार्यालयं बंद राहणार असली तरी जीवनावश्यक वस्तू, औषधं, औषधं बनवणारे कारखाने, अन्नधान्याची दुकानं, बेकरी, पशुखाद्य, पाळीव प्राणीखाद्य दुकानं, दवाखाने उघडे राहतील. नागरिकांना जीवनाश्यक वस्तू मिळतील. कृषी उद्योग, बियाणं खतं वाहतुकीलाच परवानही असेल, अशी माहितीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.


देशांतर्गत वाहतूक बंद करा – पंतप्रधानांना पत्र


रेल्वे आणि सार्वजनिक वाहतूक बंद केली असली आणि आंतरराष्ट्रीय विमानवाहतूक थांबवण्यात आली असली तरी देशांतर्गत विमान वाहतूक मात्र सुरु आहे. ही विमानवाहतूक बंद करावी अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.


कोरोना संकटाशी लढण्यासाठी अंगणवाडी सेविका, होमगार्डना प्रशिक्षण


कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला तर डॉक्टरांबरोबरच नर्स आणि अन्य मनुष्यबळ कमी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविका आणि होमगार्डना प्रशिक्षण देऊन तयार ठेवण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.


प्रार्थनास्थळ बंद राहणार


सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळं बंद राहणार असून तिथे पूजाअर्चा करण्यासाठी केवळ पुजारी, मौलवी, फादर अशा काही मोजक्या व्यक्तिंनाच प्रवेश असेल असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.


ही मौजमजा करण्याची वेळ नाही


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला रविवारी जनतेनं प्रतिसाद दिला. त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी जनतेला धन्यवाद दिले आहेत. पण केवळ टाळ्या, वाजवणं म्हणजे व्हायरस भागवणं नव्हे. जीवाची बाजी लावून लढण्याऱ्यांसाठी ते होतं, असं सांगत मुख्यमंत्र्यांनी जनतेला सरकारच्या सूचना पाळण्याचं आवाहन केलं. 


हा निर्णायक टप्पा आहे. पुढचे दिवस महत्वाचे आहेत, हे ओळखलं नाही तर वेळ मिळून आपण उपयोग केला नाही असं होईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.


अजूनही काही लोकांना हे संकट वाटत नाही. फेरफटका मारून येऊया, म्हणून ते बाहेर पडतात. मात्र असं करू नका, मौजमजा करण्याची वेळ नाही, असं मुख्यमंत्र्यांनी बजावलं आहे.