चक्रीवादळानंतर मुंबईत जोरदार पाऊस; या ठिकाणी 20 तास बत्तीगुल, झाड कोसळून महिलेचा मृत्यू
चक्रीवादळाचा (Cyclone Tauktae) कहर सुरुच आहे. चक्रीवादळाचा मोठा परिणाम महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यात दिसून आला. राज्यात 10 लोकांचा मृत्यू झाला.
मुंबई: चक्रीवादळाचा (Cyclone Tauktae) कहर सुरुच आहे. सोमवारी रात्री गुजरातच्या सौराष्ट्र किनाऱ्यावर भीषण चक्रीवादळ धडकले आहे. यावेळी ताशी 185 किलोमीटर वेगाने वारे पुढे सरकले. भारतीय हवामान विभागाच्या (आयएमडी) मते, हे चक्रीवादळ गेल्या 23 वर्षांत गुजरातमधील सर्वात भयंकर वादळ ठरले आहे. दरम्यान, मुंबईला लागून असलेल्या विरार पश्चिममध्ये 20 तासांपेक्षा जास्त काल वीज नव्हती. तर मुंबईत सकाळपासूनच मायानगरीच्या अनेक भागात मुसळधार पाऊस सुरु होता. तर वरळीत झाड पडून एका महिलेचा मृत्यू झाला.
चक्रीवादळाचा महाराष्ट्रात तडाखा
मुंबईला लागून असलेल्या विरार पश्चिममध्ये 20 तासांपर्यंत विद्युत पुरवठा खंडीत होता. त्यामुळे अनेक भागात अंधार होता. मुंबई आणि परिसरात सकाळी या भागात बर्याच ठिकाणी मुसळधार पाऊसदेखील झाला. यामागचे कारण चक्रीवादळाचा परिणाम असल्याचे सांगण्यात येत. त्याचप्रमाणे इतर काही भागात सामान्य सार्वजनिक सेवेवर या वादळाचा परिणाम दिसून आला. महाराष्ट्रात सर्वाधिक फटका कोकण भागाला बसला. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात घरांसह झाडांची मोठी पडझड झाली.
चक्रीवादळाच्या आपत्तीत 10 ठार
चक्रीवादळाचा मोठा परिणाम महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यात दिसून आला. यावेळी मुंबईसह अनेक जिल्ह्यात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. कोकणात झालेल्या चक्रीवादळाच्या वादळाशी संबंधित वेगवेगळ्या घटनांमध्ये सात जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. रायगड जिल्ह्यात चार जणांचा मृत्यू. तर रत्नागिरीत दोघांचा तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात एका खलाशाचा मृत्यू झाला, तर मुंबईत वरळी येथे झाडाची फांदी पडून महिलेचा मृत्यू झाला तर नवी मुंबई विद्युत खांब पडून तरुणाचा मृत्यू झाला आणि उल्हासनगरमध्ये झाड पडल्याने दोन जणांचा मृत्यू. अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आनंदवाडी नांगरुन ठेवलेल्या दोन बोटी बुडाल्या ज्यावर 7 खलाशी होते. त्यातील तीन जण बेपत्ता झालेत.
मुंबईतील वानखेडे स्टेडियमचे चक्रीवादळाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वानखेडे स्टेडियमची स्टँड आणि साइट स्क्रीन कोसळली आणि खाली पडली. वानखेडे स्टेडियमच्या स्थिती पाहून कोणालाही विश्वास बसणार नाही, इतकी वाईट अवस्था झाली आहे. याबाबत ट्विटरवर वानखेडे स्टेडियमच्या नुकसानीचे फोटो शेअर करत लोकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.