मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील चित्तथरारक नाट्यमय घडामोडींनंतर अखेर महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येणार हे निश्चित झाले आहे. उद्या शिवाजी पार्क येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील आणि काँग्रेसचे बाळासाहेब थोरात हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. या सर्व घडामोडींबद्दल दादरच्या बालमोहन शाळेतील आजीमाजी विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाला आहे. बालमोहन शाळेचे दोन माजी विद्यार्थी उद्या राज्याच्या सत्तेत महात्वाची पदं स्वीकारण्याची शपथ घेणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


दादरच्या बालमोहन शाळेने अनेक दिग्गज कला, क्रीडा, साहित्य तसेच राजकारणाला दिले आहेत. पण शाळेतील विद्यार्थी सध्या मोठ्या आनंदात आहेत. सर्वांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरील स्टेटस सध्या एकसारखेच दिसत आहेत. यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी नेते जयंत पाटील यांचे अभिनंदन केले जात आहे. 



उद्धव ठाकरे आणि जयंत पाटील हे बालमोहन शाळेचे माजी विद्यार्थी आहेत. उद्धव ठाकरे हे १९७६ तर जयंत पाटील १९७८ च्या बॅचचे विद्यार्थी आहेत. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे. तर राष्ट्रवादीचे विधिमंडळ नेते आणि शरद पवार यांच्या जवळचे असलेले जयंत पाटील हे उपमुख्यमंत्री पदी असणार हे देखील जवळपास निश्चित मानले जात आहे. याचा आनंद बालमोहन शाळेतील आजीमाजी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व्यक्त करताना दिसत आहेत.


उद्धव ठाकरेंचे कौतुक 


वांद्रे येथील ट्रायडंट हॉटेलमध्ये महाविकास आघाडीने आपल्या १६२ आमदारांसहीत शक्तीप्रदर्शन केले होते. त्याच्या दुसऱ्या दिवशी महाविकास आघाडीच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक याच ठिकाणी पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असतील असा ठराव एकमताने पास झाला. याला महाविकास आघाडीच्या सर्व पक्षीय नेत्यांनी अनुमोदन दिले. यावेळी जयंत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांचे तोंडभरून कौतुक केले. माझी आणि उद्धव ठाकरे यांची याआधी फारशी भेट झाली नाही. पण यानिमित्ताने मी त्यांना जवळून भेटलो. उद्धव ठाकरे हे खूप साधे सरळ विचार करणारे नेते आहेत याची हे मला या भेटीदरम्यान कळाल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले.



शपथविधीची तयारी


शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गुरुवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. ठाकरे कुटुंबातून पहिल्यांदा मुख्यमंत्री होणार आहे. त्य़ामुळे शिवसेनेकडून शपथविधी सोहळा ऐतिहासिक करण्यात येणार आहे. त्यामुळे अनेक मोठ्या नेत्यांना यासाठी आमंत्रण पाठवण्यात येणार आहे. ज्यामध्ये विविध राज्यांच्या मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांचा समावेश आहे. शिवाज पार्क येथे हा शपथविधी सोहळा होणार असून जवळपास ७० हजार खुर्च्या येथे लावण्यात येत आहेत. तसेच एका मोठ्या मंचावर जवळपास १०० जणांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात येत आहे.