मुंबंई : गोविंदा रे गोपाळ..... असं म्हणतं गोविंदा दहीहंडीच्या दिवशी घराबाहेर पडतात. रस्त्यावर किंवा आयोजकांच्या इथे म्हणा या गोविंदा पथकांचं स्वागत दहीहंडीच्या गाण्यांनी केलं जातं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र यंदा तसं काही चित्र आपल्याला पाहायला मिळणार नाही. त्याला कारणही तसंच काहीसं आहे दहीहंडीच्या ऐन तोंडावर राज्यभरातील लाउडस्पीकर व्यावसायिकांनी उद्यापासून बेमुदत संपावर जाण्याची हाक दिली आहे. पोलिसांकडून होणाऱ्या मारहाणीच्या आणि कारवाईच्या निषेधार्थ हा संप पुकारण्यात येत असल्याने सणासुदीच्या काळात राज्यभरात लाउडस्पीकर बंद राहणार आहेत. त्यामुळे यंदा गोविंदाचा उत्साह वाढवणारी गाणी आपल्याला ऐकू येणार नाहीत. 


पुण्यात साऊंड अँड जनरेटर्स असोसिएशनने हा बंद पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. पोलिसांकडून डी.जे.चालकांना होणारी मारहाण, क्षुल्लक कारणावरून साऊंड सिस्टम जप्त करण्याची होणारी कारवाई आणि होणारा छळ या विरोधात हा बेमुदत संप पुकारण्यात येत असल्याचं असोसिएशनने स्पष्ट केलं. सामान्य वातावरणाचा आवाजही ५५ डेसिबल असतो. मग स्पीकर वाजवायचे तरी कसे? असा सवाल करतानाच पोलिसांकडे डेसिबल मोजण्याची यंत्रणाही नाही, असेही असोसिएशनने स्पष्ट केले. 


हा संप राज्यव्यापी असणार असून या संपाला साऊंड व्यावसायिकांची मातृसंस्था असलेल्या 'पाला' या संघटनेनेही पाठिंबा दिला आहे. दहीहंडीसह कोणत्याही सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक कार्यक्रमात लाउडस्पीकर वाजविण्यात येणार नसल्याचं असोसिएशनने स्पष्ट केल्याने उत्सव मंडळांचे धाबे दणाणले आहेत.


या अगोदरच दहीहंडीच्या उत्सवावर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं सावट आहेच. असं सगळं असताना लाऊडस्पीकरच्या समितीने घेतलेला हा निर्णय नक्कीच गोविंदाना निराश करणारा आहे. तरीही अजून १० दिवस आहेत. या दरम्यान यांचा कोणता निर्णय बदलतो का याकडे साऱ्या गोविंदा पथकांच लक्ष लागून राहिलं आहे.