एक बेडूक आणि त्याची दोन पोरं; उद्धव ठाकरेंचा राणेंवर हल्ला
नारायण राणेंवर खरपूस टीका
मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यातील भाषणात भाजपचे खासदार नारायण राणे यांच्यावर हल्लाबोल केला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी 'बेडकीच्या पिल्लाने बैल पाहिला' ही गोष्ट सांगत नारायण राणेंची तुलना बेडकाशी केली आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले,”प्रत्येक दसरा मेळाव्याला काय बोलणार असं विचारलं जातं. पण, टार्गेट करण्यासाठी नाही. पण, सध्या करोना जोरात आहे. बिहारमध्ये मोफत लस देणार आहेत. काही जणांना इंजेक्शन द्यावं लागतं. काही जणांना तर माणसाचं नाही, तर गुरांचं इंजेक्शन द्यावं लागतं. काही जण तर अशी बेडक आहेत. तुम्हाला माहिती आहे, एक बेडूक आणि त्याची दोन पोरं. या पक्षातून त्या पक्षात. या बेडकाच्या पिल्लांनी वाघ पाहिला. त्यांनी बाबांना सांगितलं. बाप आवाज काढतोय पण, आवाज काही,” अशी टीका ठाकरे यांनी केली.
शिवसेनेचा यंदाचा ५३ वा दसरा मेळावा. कोरोनाच्या सावटामुळे यंदा दसरा मेळावा शिवाजी पार्कात न होता स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात साजरा करण्यात आला. फक्त ५० लोकांच्या उपस्थितीत हा दसरा मेळावा साजरा झाला.
शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा साधेपणाने साजरा करण्यात आला. स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहाच्या हॉलमध्ये दसरा मेळावा साजरा होणार आहे. १९६६ साली शिवसेनेचा दसरा मेळावा पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केला. शिवाजी पार्कवर हा दसरा मेळावा गेल्या पाच दशकांपासून साजरा होत आहे. ३० ऑक्टोबर १९६६ साली शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा शिवाजी पार्कवर पार पडला. तेव्हापासून या दसरा मेळाव्याची परंपरा आहे.
एकच पक्ष, एकच नेता आणि एकच मैदान असा या दसरा मेळाव्याचं वेगळेपणं आहे. हे वेगळेपण शिवसेनेने जपलं आहे. फक्त शिवसैनिकच नाहीत तर संपूर्ण जनता 'दसरा मेळावा' पाहण्यास आणि खास करून यामधील भाषण ऐकण्यास उत्सुक असते.
गेल्यावर्षीच्या म्हणजे २०१९ च्या दसरा मेळाव्यात '२०२० मध्ये शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल', असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाकीत केलं होतं. आणि हे भाकीत खरं ठरलं आहे. यंदा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यंदा मुख्यमंत्री म्हणून देशाला संबोधित करतील. यंदाचा शिवसेनेचा ५३ वा दसरा मेळावा आहे.