अखेर मुलीनं स्वतःचं यकृत पित्याला दिलं
आता नेहा आणि तिचे वडील दोघांचाही प्रकृती चांगली आहे. वडील बरे झाले, त्यामुळे नेहालाही आनंद झाला आहे.
गणेश कवाडे झी मीडिया, मुंबई : अंधेरीत राहणारे जगदीश पटेल गेल्या ६ महिन्यापासून यकृताच्या आजारामुळे त्रस्त होते. त्यांचं यकृत फक्त वीस टक्केच काम करत होतं. त्यामुळे जगण्याची आशाही अंधुक झाली होती.
या आजारावर कोणताच उपाय नसल्याचे डॉक्टरांनी पटेल कुटुंबीयांना सांगितलं. हे ऐकुन कुटुंबाला धक्का बसला. जगदीश यांचं यकृत बदली करण्याची गरज असल्याचे डॉक्टरांनी सांगितलं. त्यासाठी खर्च होता २५ लाखांचा. पण जगदीश पटेल यांची २४ वर्षाची मुलगी नेहा पटेल हिनं स्वतःचं यकृत आपल्या वडिलांना देण्याचं ठरवलं. अखेर ३१ ऑगस्टला यकृत ट्रांसप्लांट शस्त्रक्रिया पार पडली.
आता नेहा आणि तिचे वडील दोघांचाही प्रकृती चांगली आहे. वडील बरे झाले, त्यामुळे नेहालाही आनंद झाला आहे.
यकृत दान केलं तर त्याचा शरीरातला भाग पुनर्निर्मित होत असतो, त्यामुळे यकृत दान केल्यानं आणखी एका व्यक्तीला जीवनदान मिळू शकतं. नेहानं वडिलांना दिलेल्या यकृतदानामुळे अवयवदानाचं महत्त्व पुन्हा समोर आलंय.