संपत्ती विकल्याने दाऊद संतापला, मुंबई उडवण्याची धमकी
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या मुंबईतील मालमत्ताचा नुकताच लिलाव करण्यात आला.
मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या मुंबईतील मालमत्ताचा नुकताच लिलाव करण्यात आला. त्याच्या मुंबईतील तीन मालमत्ता सैफी बु-हानी ट्रस्टने विकत घेतल्या आहेत. त्यामुळे दाऊद चांगलाच संतापला आहे. या मालमत्तांचा लिलाव झाल्याने दाऊदच्या साथीदारांकडून धमक्यांचे फोन येऊ लागले आहेत.
दाऊदच्या उस्मान चौधरी नामक साथीदाराने एका वृतवाहिनीला फोन करून ही धमकी दिल्याचे वृत्त आहे. 'कुणीही दाऊदची मालमत्ता ताब्यात घेतली तर १९९३ च्या बॉम्बस्फोटाची मुंबईत पुरावृत्ती होईल. मुंबईत पुन्हा बॉम्बस्फोट करू,' असा इशारा त्याच्या साथीदाराने दिला आहे.
मंगळवारी दाऊदच्या मुंबईतील तिन्ही मालमत्तांचा लिलाव करण्यात आला. दाऊदच्या साथीदाराने दिलेल्या या नव्या धमकीमुळे मुंबई पोलीस सतर्क झाली आहे.
याआधीही २००२ आणि २०१५ मध्ये दाऊदच्या मालमत्तांची निलामी झाली होती. हा लिलाव होऊ नये म्हणून तेव्हा दाऊदची माणसं सक्रिय झाले होते. त्यावेळी कोणत्याही परिस्थितीत भाईची मालमत्ता दुसऱ्यांच्या ताब्यात जाऊ नये, असे आदेशच दाऊदचा भाऊ अनीस आणि छोटा शकीलने त्यांच्या साथीदारांना दिले होते, असे वृत्त आहे.