ठाणे : ठाणे मध्यवर्ती तुरुंगातील महिला कैद्यांनी बनविलेल्या राखींना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. विशेष म्हणजे आज सर्वत्र महागाई वाढली असताना बाजारातील तुलनेत या राखीचे भाव तिपटीने कमी आहेत.


विविध गुन्ह्यांमध्ये अटक झालेल्या ९० महिला कैदी ठाणे मध्यवर्ती कारागृहात आहेत. या महिला कैद्यांनी विविध १२ प्रकारातील ६०० राख्या तयार केल्या आहेत, अशी माहिती ठाणे मध्यवर्ती कारागृहाचे तुरुंग अधीक्षक नितीन वायचळ यांनी दिली. या राख्या सध्या ठाणे मध्यवर्ती कारागृहाच्या बाहेर असलेल्या तुरुंग विक्री केंद्रात विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. अवघ्या ६ ते १० रुपयांमध्ये या राखी उपलब्ध आहेत. या महिलांना त्यांच्या भावांबरोबर जरी हा सण  साजरा करता येत नसला तरी त्यांनी बनविली राखी कोणत्या तरी भावाच्या हातावर बांधली जाणार यांचं समाधान मात्र त्यांना नक्की मिळणार आहे.