मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळीनंतर बॉम्ब धमाका केला आहे. गेल्या काही दिवसांपासून एनसीबी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. असं असताना देवेंद्र फडणवीसांवर देखील आरोप करण्यात आले. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिकांवर आरोप केले आहेत. या पत्रकार परिषदेत फडणवीसांनी 5 महत्वाचे खुलासे केले आहेत. 


1993 च्या साखळी बॉम्बस्फोटातील आरोपींशी मलिकांचे संबंध 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मलिक यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सलीम - जावेदची स्टोरीही नाही आणि इंटरव्हलनंतरचा सिनेमाही नाही. फार गंभीर आणि देशाच्या सुरक्षेशी जोडलेला हा मुद्दा आहे, असे फडणवीस म्हणाले. सरदार शहावली खान हे 1993 चे गुन्हेगार आहेत. यांना जन्मठेपेची शिक्षा झाली असून ते तुरुंगात आहेत. सर्वोच्च न्यायालयाने ती शिक्षा कायम केली आहे. टायगर मेमनच्या नेतृत्वात ते फायरिंगच्या ट्रेनिंगमध्ये सहभागागी झाले. बीएसई आणि पालिकेमध्ये बॉम्ब कुठे ठेवायचे, याची रेकी त्यानी केली होती. टायगर मेमनच्या घरी बॉम्बब्लास्टच्या कारस्थान मांडणीवेळी ते उपस्थित होते. टायगर मेमनच्या घरी गाड्यांमध्ये त्यानी आरडीएक्स भरले. साक्षीदारांनी याविषयी साक्ष दिल्यानंतर न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा दिली, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.


सलीम पटेल हसीना पारकरचा माणूस 


मोहम्मद अली इशाक पटेल तर्था सलीम पटेल. आर. आर. पाटील इफ्तार पार्टीमध्ये गेले होते तेव्हा त्यांची गुन्हेगारासोबत फोटो व्हायरल झाला होता. त्यांचा दोष काही नव्हता. पण ज्या दाऊदच्या माणसासोबत म्हणून त्यांचा फोटो व्हायरल झाला, तो हा सलीम पटेल. तो हसीना पारकरचा बॉडीगार्ड, ड्रायव्हर, फ्रंटमॅनही होता. हसीना पारकरला 2007मध्ये अटक झाली, तेव्हा सलीम पटेल यालाही अटक झाली. दाऊदनंतर हसीना पारकरच्या नावाने संपत्ती गोळा केली जायची. सलीम पटेलच्या नावाने पॉवर ऑफ अॅटर्नी करून पैसा गोळा केला जायचा. हा सलीम पटेल जमीन लाटण्याच्या धंद्यातला सर्वात प्रमुख माणूस होता, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.


कुर्ल्यातील LBS वरील जमीन मलिकांची


कुर्ल्यामध्ये जवळपास तीन एकर जागा केवळ 30 लाखात घेतली. याचा व्यवहार हा 20 लाखांचा झाला आहे. मात्र, खरेदी केलेल्या जमीनतून महिन्याला 1 कोटी रुपये भाडे घेत आहेत. या जागेला गोवावाला कंपाऊंड असे म्हटले जाते. गोवावाला म्हणून व्यक्ती होते, त्यांची ही जागा होती. कुर्ल्यात एलबीएस रस्त्यावर मोक्याच्या ठिकाणी ही जागा आहे. या जमिनीची एक रजिस्ट्री सॉलिडस नावाच्या कंपनीसोबत झाली. मरियमबाई गोवावाला, मुदीरा प्लंबर या दोघांकडून सलीम पटेल हे पॉवर ऑफ ऍटर्नी होल्डर आहे. विक्री करणारा सरदार शहावली खान आहे. म्हणजे या दोघांनी मिळून या जमिनीची विक्री सॉलिडस कंपनीला केली. ही कंपनी नवाब मलिक यांच्या परिवाराची आहे. घेणाऱ्याची सही फराज मलिक नावाच्या व्यक्तीची आहे. या सॉलिडसमध्ये 2019मध्ये खुद्द नवाब मलिक देखील होते. आजही त्यांच्या कुटुंबाचे लोक त्यात आहेत, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.


बॉम्बस्फोट आरोपींसोबत केला व्यवहार 


कुर्ल्याच्या फोनिक्स मार्केटच्या जमिनीवेळीच एलबीएस रोडवरची ही जमीन रेडीरेकनर रेट ८५०० आणि मार्केट रेट २०५३ रुपये प्रती चौरस फूट दराने घेतली गेली. ही जमीन ३० लाखात खरेदी केली गेली. त्यातही १५ लाखांचं पेमेंट हे मालकाला न मिळता त्यांचा पॉवर ऑफ ऍटर्नी होल्डर सलीम पटेलच्या खात्यात जमा झाले. त्यानंतर १० लाख रुपये शहावली खान ज्याला सरदार खान म्हणतात, त्याला मिळाले. त्यातही ५ लाख नंतर मिळतील असं लिहिलं. म्हणजे २० लाखात एलबीएस रोडवर ३ एकरच्या जमिनीचा व्यवहार झाला.


मुंबईच्या खुन्यांशी नवाब मलिकांचे व्यवहार?


2003मध्ये हा सौदा झाला, तेव्हा नवाब मलिक मंत्री होते. आता मंत्री झाल्यावर याचा व्यवहार झालेला नाही. मात्र, अंतिम रजिस्ट्री झाली त्याच्या काही दिवस आधी नवाब मलिक यांना पद सोडावे लागले होते. पण तुम्हाला माहिती नव्हते की सलीम पटेल कोण आहे? मुंबईच्या गुन्हेगारांकडून तुम्ही जमीन खरेदी का केली? मुंबईत बॉम्ब स्फोटातील दोषींकडून तुम्ही जमीन का खरेदी केली? अशा कोणत्या कारणामुळे त्यांनी एलबीएसमधली तीन एकरची जमीन इतक्या स्वस्तात दिली. या आरोपींवर 'टाडा' लागला होता. 'टाडा'च्या कायद्यानुसार आरोपीची सगळी मालमत्ता सरकार जप्त करते. मग टाडाच्या आरोपीची जमीन जप्त होऊ नये, यासाठी तुम्हाला ट्रान्सफर केली गेली का? असे अनेक प्रश्न फडणवीस यांनी यावेळी उपस्थित केलेत.