मुंबई : राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरु होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे पावसाळी अधिवेशन दोन दिवसांचं करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला घेतलेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी विविध विषयांवरुन सरकारवर परखडत शब्दात टीका केली. 


'लोकशाहीला कुलूप ठोकण्याचं काम'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

“कोविडच्या नावाखाली लोकशाहीला कुलूप ठोकण्याचं काम या सरकारकडून केलं जात आहे. राज्याच्या निर्मितीला 60 वर्ष पूर्ण झाली. पण जे आतापर्यंत घडलं नाही ते आता घडताना दिसत आहे. राज्य सरकारने विधानमंडळात सदस्यांनी बोलू नये अशी व्यवस्था केली जात आहे”, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे. 


अधिकारी काय माशा मारायला बसवले आहेत का?


राज्याची आतापर्यंत 7 अधिवेशनं झाली, याचा कालावधी 36 दिवसांचा होता. उद्याचं आठवं अधिवेशन धरून एकूण कालावधी 38 दिवस आहे. म्हणजेच सरासरी 5 दिवस देखील सरकारच्या काळात अधिवेशन चाललेलं नाही. कोविड काळात चाललेल्या अधिवेशनांचे एकूण दिवस बघितले तर ते 14 आहेत. सदस्यांनी 35 दिवस टाकलेले त्यांचे प्रश्न व्यापगत होणार आहेत. सर्व प्रश्न निरस्त केले गेले आहेत. त्यामुळे उत्तरे मिळणार नाहीत. पण प्रश्नच विचारायचे नाहीत आणि विचारले तरी उत्तर दिलं जाणार नाही. मग एवढे अधिकारी आणि कर्मचारी राज्य सरकारच्या सेवेत असताना काय माशा मारायला बसवले आहेत? असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला.


'सरकार अधिवेशनातून पळ काढतंय'


आमच्याकडे शंभरपेक्षा अधिक विषय आहेत, ज्यावर चर्चा होऊ शकते. सभागृहात जे मांडता येईल ते मांडण्याचा प्रयत्न करु, सभागृहात मांडता आलं नाही तर माध्यमांसमोर येऊन मांडू, रस्त्यावर येऊन मांडू, जनतेसमोर मांडू असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. कोरोनाच्या नावावर सर्व काही चालू आहे. अशा प्रकारे लोकशाचीही थट्टा तात्काळ बंद केली पाहिजे. आम्ही सत्ताधाऱ्यांचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणू या भीतीने सरकारने अधिवेशनातून पळ काढला आहे, पण आम्ही सरकारचा चेहरा उघडा पाडल्याशिवाय राहणार नाही”, असं देखील देवेंद्र फडणवीसांनी नमूद केलं.


OBC आणि मराठा आरक्षणाचे मुद्दे हे राज्य सरकारचेच विषय असल्याचं फडणवीसांनी पुन्हा एकदा म्हटलंय. तर शिवसेनेसोबत शत्रुत्व नाही, पण त्यांनी साथ सोडल्यामुळे वैचारिक मतभेद आहेत असं सांगत दोन्ही पक्षांमध्ये कोणतीही चर्चा सुरू झालं नसल्याचंही फडणवीसांनी स्पष्ट केलंय. 


पुण्यातील स्वप्नील लोणकर या तरुणाच्या आत्महत्येवर बोलताना फडणवीस यांनी राज्य सरकारने MPSC चे सदस्यच नेमले नाहीत, मग परीक्षा कोण घेणार, असा प्रश्न विचारला आहे. मुलाखत होत नाहीए, तरुण प्रतीक्षेत असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे.