मुंबई : हे सरकार आहे का?, मंत्री झाले आपल्या विभागाचे राजे, प्रत्येक विभागात एक वाझे, असा जोरदार हल्लाबोल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) नी केला आहे. पोलीस विभागातील वाझे सापडला, इतर विभागातील वाझे अजून बाकी आहेत, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. इतर विभागातील वाझे कोण आहेत याची माहिती आमच्याकडे आहे, असा इशाराही फडणवीस यांनी दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कुठल्याही सरकारला एक मुख्यमंत्री असतो, इथे काही मंत्री स्वत:ला मुख्यमंत्री समजून काम करत आहेत. या सरकारमध्ये रोज नवे निर्णय होतात, एका तासात त्या निर्णयाला स्थगिती मिळते आणि पुन्हा मंजुरी दिली जाते, हे सरकार आहे की सर्कस आहे?, असा टोला फडणवीस यांनी लगावला आहे. 


फडणवीसांचं राज्य सरकारला आव्हान 
सरकारमधल्या कोणत्याही मंत्र्याने माझ्यासोबत डिबेट करावं असं थेट आव्हान फडणवीस यांनी दिलं आहे. भ्रष्टाचार आणि गोंधळ बाहेर येईल म्हणून सरकार अधिवेशनापासून पळ काढत असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे. 


सरकारचा नाकर्तेपणा जबाबदार
ओबीसी आरक्षण सरकारच्या नाकर्तेपणामुळे गेलं, असा घणाघात फडणवीसांनी सरकारवर केला आहे. सरकारमधील आमदारांच्या मुलानंच ओबीसी आरक्षणाविरोधात याचिका दाखल केली. आरक्षण रद्द होणं हे महाविकास आघाडीचं पाप असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे. 


मृत्यूच्या सापळ्याचं महाराष्ट्र मॉडेल
देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत, सर्वाधिक मृत्यूही महाराष्ट्रात नोंदवले गेलेत, मृत्यूच्या सापळ्याचं हे महाराष्ट्र मॉडेल आहे असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुंबईच्या बाहेर महाराष्ट्र आहे का? नागपूर, औरंगाबाद, नाशिक, पुणे महाराष्ट्रात आहे का? मग कुठे आहे सरकार? नाशिक, नागपूर, औरंगाबादमध्ये एक कोविड सेंटर या सरकारनं काढलं का दाखवा? कोरोना काळात प्रत्येक खरेदीमध्ये भ्रष्टाचार पाहायला मिळाल्याचा गंभीर आरोपही फडणवीसांनी केलाय.