मुंबई: राहुल गांधी यांना स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नखाचीही सर नाही. त्यांनी स्वत:ला 'गांधी' समजण्याची घोडचूक तर अजिबातच करू नये, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांना फटकारले. राहुल गांधी यांनी शनिवारी दिल्लीच्या रामलीला मैदानावर भाजपवर पलटवार करताना स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा उपरोधिकपणे उल्लेख केला होता. सत्य बोलण्यासाठी मला माफी मागायला सांगितली जात आहे. मात्र, तसे करायला मी काही राहुल सावरकर नाही, तर राहुल गांधी आहे, असा टोला त्यांनी भाजपला लगावला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'माफी मागायला मी काही राहुल सावरकर नव्हे, राहुल गांधी आहे'


राहुल गांधी यांच्या या वक्तव्यानंतर भाजपचे नेते प्रचंड आक्रमक झाले. देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा ट्विट करून राहुल गांधी यांना लक्ष्य केले. त्यांनी म्हटले की, राहुल गांधी यांचे हे विधान अतिश्य निंदनीय आहे. ते स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नखाचीही बरोबरी करू शकत नाहीत. त्यांनी स्वत:ला गांधी समजण्याची घोडचूक अजिबात करू नये. केवळ गांधी आडनाव असल्याने कुणी 'गांधी' होत नाही. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी देशासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांच्याबद्दल अशी भाषा वापरणे, हा तमाम देशभक्तांचा अवमान आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी संपूर्ण देशाची माफी मागितली पाहिजे, असे फडणवीस यांनी म्हटले. 


तुमच्यासाठी 'राहुल जिन्ना' हेच नाव योग्य; भाजपचा पलटवार




दरम्यान, राहुल गांधी यांच्या या विधानाचे पडसाद महाराष्ट्रातही उमटण्याची शक्यता आहे. आम्ही गांधी आणि नेहरूंचा आदर करतो. त्याप्रमाणे तुम्हीही सावरकरांचा आदर करा, असे संजय राऊत यांनी राहुल गांधींना ठणकावून सांगितले. शिवसेना आणि भाजपच्या विचारसरणीत असलेल्या फरकामुळे ते एकत्र कसे नांदणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. मात्र, आम्ही किमान समान कार्यक्रमाच्याआधारे सर्वकाही निभावून नेऊ, असे शिवसेना आणि काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितले होते. मात्र, राहुल यांच्या विधानामुळे आता या दोन्ही पक्षांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे.