Devendra Fadnavis in Black & White: ...म्हणून उद्धव ठाकरेंनी आम्हाला सोडचिठ्ठी दिली; फडणवीसांचा गौप्यस्फोट
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray: `झी 24 तास`चे संपादक निलेश खरे यांनी घेतलेल्या `ब्लॅक अॅण्ड व्हाइट` कार्यक्रमातील विशेष मुलाखतीत फडणवीसांनी केला गौप्यस्फोट
Devendra Fadnavis Interview: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उद्धव ठाकरेंनी भारतीय जनता पार्टीची साथ का सोडली, यासंदर्भात मोठा गौप्यस्फोट केला आहे. 'झी 24 तास'च्या 'ब्लॅक अॅण्ड व्हाइट' या विशेष कार्यक्रमामध्ये मुख्य संपादक निलेश खरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) नाराजीबद्दल उघडपणे भाष्य केलं. देवेंद्र फडणवीस यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या घडामोडींचा संदर्भ देत उद्धव ठाकरेंनी भाजपाची साथ का सोडली याबद्दलचं विश्लेषण सविस्तरपणे केलं.
"ती इच्छा मान्य करणं शक्य नव्हतं..."
तुमच्याकडे युतीच्या काळात उद्धवजींनी केलेल्या सगळ्या मागण्या मान्य झाल्या. मग उद्धवजी नाराज का होते? त्यांनी तुम्हाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय का घेतला? असा प्रश्न फडणवीस यांना मुलाखतीमध्ये विचारण्यात आला. हा प्रश्न ऐकून फडणवीस मनसोक्तपणे हसले आणि त्यांनी उत्तर देण्यास सुरुवात केली. "त्यांनी सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय हा केवळ या करता होता कारण त्यांच्या मनात एक सुप्त इच्छा होती. बाळासाहेबांच्या स्मारकासाठी मी महापौर बंगला देऊ शकलो असतो. पण त्यांची ती इच्छा पूर्ण करु शकत नव्हतो. ती इच्छा होती मुख्यमंत्री बनण्याची. पण मला ते शक्य नव्हतं कारण माझ्या पक्षाच्या जागा जास्त होत्या. माझ्या पक्षाचं स्टेक जास्त होतं," असं फडणवीस यांनी सांगितलं.
कधी शब्दच दिला नव्हता...
तसेच पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी, "त्यांना (उद्धव ठाकरेंना) मुख्यमंत्रिपद देण्याचा कधीच शब्द दिला नव्हता. प्री पोल एक अलायन्स त्यांनी राष्ट्रवादीबरोबर केलं होतं. नंबर समोर आले तसं त्यांना कळलं की तीन पक्ष एकत्र आलं की सरकार स्थापन होऊ शकतं लक्षात आलं आणि त्या क्षणी त्यांनी ठरवलं की आपल्याला मुख्यमंत्री व्हायचं आहे. म्हणून त्यांनी माझे फोनही उचलले नाही आणि चर्चाही केली नाही. मला वाटतं इतिहासात पहिल्यांदा झालं की दोन पक्ष एकत्रित लढले. जिंकून आल्याच्या पहिल्याच दिवशी एक पक्ष दुसऱ्या पक्षाला सोडून जातो. त्यांच्या मनात इच्छा होती मुख्यमंत्री बनायची. म्हणून ते काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत गेले. आमच्याशी चर्चाही केली नाही. त्याचा परिणाम त्यांना भोगावा लागतोय," असंही म्हटलं.
अडीच वर्षांमध्ये 'त्यांनी' उद्धव ठाकरेंना संपवलं
फडणवीस यांनी याच मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरेंच्या एका विधानाचा संदर्भ देत अडीच वर्षांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना संपवल्याचं विधान केलं. "ते म्हणायचे ना युतीमध्ये 25 वर्ष सडले. पण हे बघा ना अडीच वर्षात संपले. दोघांनी (काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने) मिळवून त्यांना संपवलं. शेवटी आपण म्हणतो ना असंगाशी संग," असं म्हणत फडणवीस यांनी सूचक विधान केलं.