मुंबई : मोदी सरकारने देशात निर्घृण पद्धतीन लॉकडाऊन लागू केले. त्यामुळे कोरोनाचा फैलाव तर रोखला गेला नाहीच, मात्र, अर्थव्यवस्था मात्र साफ उद्ध्वस्त झाली, अशी टीका शिवसेनेने सामनामधून केली. शिवसेनेच्या या टीकेला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'महाराष्ट्राने देशाच्या आधी लॉकडाऊन घोषित केला. यानंतर जाहीरात करून महाराष्ट्राला देश फॉलो करत असल्याचं सांगितलं गेलं. पण आता घाईघाईत लॉकडाऊन झाल्याचं सांगत आहेत, मग घाईघाईत लॉकडाऊन देशाने केला का महाराष्ट्राने केला?' असं प्रश्न फडणवीस यांनी विचारला. 


'शिवसेना ५ वर्ष आमच्या बरोबर होती, तरीही टीकाच करायची. सत्तेत असतानाही त्यांनी विरोधी पक्षाचं काम केलं, आणि आजही तेच करत आहे. भूमिका घ्यायची मात्र ती दररोज बदलली जाते, एक भूमिका तर घ्या. एक दिवस सरकारची तारीफ होते, मग मोदींसारखं कुणी नाही, असं म्हणलं जातं, मग मोदी कसे वाईट हे सांगीतलं जातं. कधी राज्यपालांवर टीका करायची, कधी कुर्निसात करायचा,' असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. 


राहुल गांधींनी राजीव बजाज यांच्या घेतलेल्या मुलाखतीचा दाखला देत, सामनामधून मोदी सरकारवर टीका करण्यात आली. यावरून फडणवीस यांनी राजीव बजाज यांच्यावरही निशाणा साधला. 'राजीव बजाज कोविड किंवा वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ नाहीत, ते ऑटोमोबाईल क्षेत्राचे तज्ज्ञ आहेत. त्यांनी रिक्षा, गाड्या याबद्दल मत व्यक्त केलं, असतं तर ते तज्ज्ञाचं मत ठरलं असतं. प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे, त्यांनी त्यांचं मत नक्की व्यक्त करावं,' अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली. 


फडणवीसांना जनतेने निवडून दिलं होतं, पण शिवसेनेने विश्वासघात केल्याचं भाजप अध्यक्ष जेपी नड्डा म्हणाले होते. त्यावरही फडणवीसांनी उत्तर दिलं. आम्हालाच कौल दिला होता, निवडणूक लढवलेल्या जगांपैकी ७० टक्के आमच्या जागा निवडून आल्या होत्या, असं फडणवीस म्हणाले. 


'महात्मा फुले जनआरोग्य योजना फक्त नोंदणीकृत रुग्णालयात केली जात आहे. काही मोठ्या रुग्णालयात बेड्स नाहीत, असं दाखवलं जात आहे, पण मागच्या दरवाजाने प्रवेश दिला जातोय. खासगी रुग्णालयांचे ८० टक्के बेड्स कागदावरच घेतले आहेत', असा आरोप फडणवीस यांनी केला आहे. 


अंतिम वर्षाच्या परीक्षेवरून कारण नसताना घोळ निर्माण झाला आहे. स्वत:च सरकारने कुलगुरू यांची समिती नेमली, मग स्वत:च परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला. विद्यार्थ्यांना असलेल्या एटीकेटीबाबत संभ्रम असल्याचं वक्तव्य फडणवीस यांनी केलं.