`नालेसफाई केली का हातसफाई?`, मुंबईतल्या पावसावरुन फडणवीसांचा निशाणा
मुंबईमध्ये कालच्या एका दिवसात पावसाने हाहाकार माजवला.
मुंबई : मुंबईमध्ये कालच्या एका दिवसात पावसाने हाहाकार माजवला. कालच्या एका दिवसात मुंबईमध्ये ऑगस्ट महिन्यातल्या आत्तापर्यंतच्या सर्वाधिक पावसाची नोंद झाली. मुंबईतल्या पावसाच्या या परिस्थितीचा आढावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. यावेळी त्यांनी मुंबई महापालिकेवर निशाणा साधला.
मुंबईमध्ये ११३ टक्के नालेसफाई झाली का हातसफाई झाली? असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला. तसंच ज्या गतीने पम्पिंग स्टेशनची उभारणी करायला हवी तशी होत नाही, त्यामुळे दक्षिण मुंबईमध्ये पाणी साचलं. गेल्या १५ वर्षांमध्ये महापालिकेने या कामांकडे दुर्लक्ष केल्याचा, हा परिणाम असल्याची टीका फडणवीस यांनी केली. मुंबईच्या बाबुलनाथ जंक्शनजवळ असणाऱ्या केम्स कॉर्नर परिसरात पावसामुळे उतारावरचा भाग खचला. या परिसराची देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली.
दरम्यान फडणवीस यांच्या टीकेला राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ३३० मिमी पाऊस पडूनही मुंबई पूर्वपदावर आली. नालेसफाई झाली नसती तर एवढा पाऊस पडून मुंबई बराच काळ तुंबली असती, अनेकांचा जीव धोक्यात आला असता. विरोधी पक्षनेते नालेसफाई झाली नाही म्हणतात, पण त्यात काही तथ्य नाही, असं वडेट्टीवार यांनी सांगितलं.
काल कुलाबा क्षेत्रात ऑगस्ट महिन्यातल्या सर्वाधिक पावसाची नोंद झाली. कालपासून आज सकाळी ८.३० वाजेपर्यंत सांताक्रूझ येथे १६२,३ मिमी, कुलाबा ३३१.०८ मिमी पाउस झाला. कुलाबा येथे काल सायंकाळी १०६ किमी प्रती तास इतका वाऱ्याचा वेग होता, तर इतरत्र हा वेग ७० ते ८० किमी प्रती तास होता. यापूर्वी १० ऑगस्ट १९९८ ला २६१ मिमी पावसाची नोंद झाली होती, त्याचा विक्रम पावसानं आज मोडून काढला.
काल मुंबईत झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडं पडल्याच्या घटनाही घडल्या. काल मस्जिद बंदर येथे दोन उपनगरीय रेल्वेमधून २९० प्रवाशांना रेल्वे पोलीस आणि एनडीआरएफने सुरक्षित बाहेर काढलं.
दरम्यान मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी कालची परिस्थिती वादळसदृष्य होती, अशी प्रतिक्रिया दिली आहे. काल ३ तासांमध्ये ३०० मिमी पाऊस पडला. वारेसुद्धा १२० किमी प्रति ताशी वेगाने वाहत होते. त्यामुळे कालच्या परिस्थितीला वादळ म्हणायला हरकत नाही, असं चहल म्हणाले. तसंच नरिमन पॉईंट आणि कुलाब्यात इतिहासात कधी एवढा पाऊस पडला नाही. मी मुंबईत अनेक वर्षांपासून राहतो. २६ जुलैलादेखील या भागात एवढा पाऊस पडला नव्हता, असं वक्तव्य चहल यांनी केलं.