मुंबई : मुंबई Mumbai शहराविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या अभिनेत्री कंगना राणौत हिला शिवसेनेकडून होणारा विरोध काही केल्या शमण्याचं नाव घेत नाही आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनीही 'क्वीन' कंगनानं आता साऱ्या महाराष्ट्राचीच माफी मागावी असा सूर आळवला होता. तिच्यावर टीका करतेवेळी त्यांनी हरामखोर अशा शब्दाचा वापर केल्याचं बोललं गेलं. ज्यानंतर राऊतांनी माध्यमाशी संवाद साधताना या शब्दाच्या वापराबाबत स्पष्टीकरण दिल्याची माहिती समोर आली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ काढला गेला. कंगना थोडी नॉटी आहे. मी तिची यापूर्वीचं वक्तव्यंही ऐकली आहेत. असं म्हणत आपण वापरलेल्या शब्दासाठी त्यांनी स्वत:ची बाजू मांडल्याचं म्हटलं गेलं. ज्यानंतर विरोधी पक्षातून अनेकांचं लक्ष याकडे वेधलं गेलं. किंबहुना विरोधी पक्षनेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनीही राऊतांचं नाव न घेता त्यांना टोला लगावला. 


'नॉटी', या शब्दावरच जोर देत अमृता यांनी केलेलं ट्विट पाहता त्याचा रोख नेमका कोणाकडे आहे, ही बाब स्पष्ट होत आहे. 'आम्ही विचार केला त्याहून ते जास्तच नॉटी आहेत. नॉटी नॉटी....', असं ट्विट त्यांनी केलं. 
दरम्यान, कंगना प्रकरणावर फडणवीस यांनी यापूर्वीही शिवसेनेला निशाणा केलं होतं. कंगनाच्या पोस्टरला चपलांनी मारण्याच्या कृत्याला त्यांनी विरोध दर्शवला होता. 



 


कंगनाच्या वक्तव्यांवरुन सध्या राजकीय वर्तुळात बऱ्याच घडामोडी पाहायला मिळत आहे. एकिकडे केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कंगनाला Y दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला असला, तरीही ९ सप्टेंबरला मुंबईत येऊ पाहणाऱ्या कंगनाला शिवसेनेच्या विरोधाला सामोरं जावं लागण्याची चिन्हं आहेत. शिवाय मुंबई महानगरपालिका कंगनाला मुंबईत दाखल होताच होम क्वारंटाईन करण्याच्या तयारीत आहे. याबद्दल पालिकेकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. महापौर किशोरी पेडणेकर यांनीही याविषयी बोलण्यास नकार दिला आहे. त्यामुळं हे प्रकरण पुढे कोणतं वळण घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.