`आपली बहिण चिडली असेल तर...` मंत्रालयातील कार्यालयाच्या तोडफोडीवर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया
Mumbai : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयात एका अज्ञात महिलेकडून तोडफोड केली. मंत्रालयातील या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
Mumbai : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadanvis) मंत्रालयातील (Mantralay) कार्यालयाबाहेर महिलेनं तोडफोड केल्याची घटना समोर आलीय. अज्ञात महिलेनं ही तडोफोड केलीय. यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. महिलेने कार्यालयाची तोडफोड केली ही कालची घटना आहे, त्या महिलेचं काय म्हणणं होतं, तीने कशा करता ते केलं, हे निश्चितपणे आम्ही समजून घेऊ. एखाद्या उद्वीगतेने तीने केलं का? काय तिची व्यथा आहे का? हे निश्चितपणे समजून घेऊ आणि तिची व्यथा दूर करण्याचा प्रयत्न करु असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
आपली बहिण चिडली असेल तर...
आपली बहिण चिडली असेल, तिची व्यथा असेल तर आपण समजून घेऊ, कोणी जाणीवपूर्वक पाठवलं असेल, तर ते देखील समजून घेऊ काही त्याच्यामागे वेगळं असेल तर ते देखील समजून घेऊ, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. आपल्या मंत्रालयात आपण सर्वांना एन्ट्री देतो, कोणतीही अडवणूक आपल्या मंत्रालयात नाहीए. अशा परिस्थितीत कधी लोकं पहिल्या मजल्यावरुन जाळीवर उडी मारतात, कधी लोकं रोष प्रकट करतात याचा अर्थ ते आपले विरोधक आहेत, असं नाहीए त्यांच्या काही अडचणी असतात. त्या दूर करण्याचा आपण प्रयत्न करतो अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
लाडक्या बहिणीला मोठा प्रतिसाद
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने'ला मोठा प्रतिसाद आमच्या बहिणी देतात, त्यावेळेस मनापासून आनंद वाटतो, आम्हाला आणखी खूप गोष्टी करायच्या आहेत. विकसित भारताकरता आणि विकसीत महाराष्ट्रासाठी आमच्या महिलांचा विकास हा सर्वात महत्त्वाचा आहे. याला काही कालावधी निश्चितपणे लागेल, पण राज्य सरकारने त्या दिशेने दृढ पाऊल उचललं आहे. पण विरोधकांच्या टिका ऐकल्यानंतर अतिशय वाईट वाटतं, राजकारणात एखाद्याने विकासाची रेषा उमटवली, तर त्यापेक्षा मोठी रेषा उमटवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. दुसऱ्याची रेषा पुसण्याचा प्रयत्न हा एकप्रकारे जनतेशी द्रोह आहे. रोज न्यायालयात जा, ही योजना कशी थांबवता येईल यासाठी प्रयत्न करा, आम्ही निवडूण आलो तर योजना थांबवून टाकू असं म्हणणं, या सगळ्या गोष्टी विरोधकांनी बंद केल्या पाहिजेत असंही फडणवीस यांनी सांगितलं.
मंत्रालयात नेमकं काय घडलं?
देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर महिलेनं तोडफोड केली. तोडफोडीनंतर या महिलेनं घोषणाबाजीही केली. महिलेनं मंत्रालयाचा पास न काढता सचिव गेटनं मंत्रालयात प्रवेश केला होता. या घटनेची पोलीस आयुक्तांनी गंभीर दखल घेतलीय. दरम्यान, यावर उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून खुलासा आलाय. ही घटना काल संध्याकाळी पावणेसातच्या सुमारास घडलीय आणि यावेळी महिला पोलीस उपस्थित नसल्यानं महिलेला पकडू शकलो नाही, असा खुलासा उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून करण्यात आलाय. याप्रकरणी कालच तक्रार दाखल करण्यात आलीय. सध्या महिलेची ओळख पटविण्याचं काम सुरू आहे.