मुंबई : शिफारस असेल तर आरे मेट्रोशेडवरील स्थगिती उठवा, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्याचवेळी अहवालाचा अभ्यास करुन निर्णय घेतला जाणार, असल्याचे स्पष्टीकरण आदित्य ठाकरेंनी दिले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरे मेट्रोशेडवरील स्थगिती उठवण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. मेट्रो कारशेड आरेमध्येच करण्याची शिफारस समितीने केली असेल, तर ती तात्काळ स्वीकारण्याची मागणी फडणवीसांनी सरकारकडे केलीय. तर अहवाल आत्ता सीएमओकडे आलाय त्यावर योग्य तो निर्णय घेतला जाईल असं आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. दरम्यान, मेट्रो ३ प्रकल्पाच्या भुयारीकरणाचं काम झपाट्याने पूर्णत्वाकडे गेले आहे. वरळी मेट्रो स्टेशनच्या भुयारीकरणाचं काम पूर्ण झाल्याची माहिती पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली. त्यांच्या उपस्थितीत महत्त्वाचा टप्पा पार पडला.


आरे कॉलनीतील मेट्रोच्या कारशेडबाबत समितीचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आला आहे. या अहवालात आरेमधून मेट्रो कारशेड हलवणे व्यवहार्य नसून त्याचठिकाणी कारशेड उभारण्याची शिफारस करण्यात आली आहे. त्यामुळे आता महाविकासआघाडी सरकार काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आरेतील मेट्रोच्या नियोजित कारशेडसाठी मोठ्याप्रमाणावर वृक्षतोड झाली होती. पर्यावरणवादी संस्थांनी याला आक्षेप घेतल्याने बराच गदारोळ निर्माण झाला होता. त्यावेळी शिवसेनेने आंदोलकांचा कैवार घेत भाजपविरोधी भूमिका घेतली होती. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर लगेचच आरेतील मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती दिली होती.