मुंबई : भारतरत्न लता मंगेशकर यांचे निधन ही देशातील प्रत्येक कुटुंबाकरिता दुःखद बातमी आहे. आपल्या भावगीतांनी ईश्वराला जागविण्याची, प्रेमगीतांनी तरुणाईला खुलवण्याची, देशभक्तीपर गीतांनी जवानांना स्फुरण देण्याची तर प्रेमळ अंगाईगीतांनी तान्हुल्यांना निजविण्याची अद्भुत जादू त्यांच्या स्वरात होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिजात भारतीय संगीत सुलभ करून लतादीदींनी ते समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत पोहचविले. त्यांचे संगीत देश, भाषा व काळ यांच्या सीमा उल्लंघून थेट अंतरात्म्याला जागवणारे होते. आपल्या दैवी स्वरांनी त्यांनी असंख्य जनसामान्य, शेतकरी तसेच कष्टकरी लोकांना सकारात्मक जीवन जगण्याची नित्य नवी उमेद, ऊर्जा व उत्साह दिला.


भारतरत्न लतादीदी महाराष्ट्राच्या कन्या होत्या याचा संपूर्ण महाराष्ट्राला सार्थ अभिमान आहे. त्या आपल्या जीवनकाळात झाल्या हे आपले सद्भाग्य होते. लता मंगेशकर यांच्या निधनामुळे संगीत विश्वातील देव्हारा रिकामा झाला आहे. त्यांचा दैवी स्वरदीप मात्र मनामनात तेवतच राहील, अशा शब्दात महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी लतादीदी यांना श्रधांजली अर्पण केली आहे.


मातृतुल्य आशीर्वाद हरपला - मुख्यमंत्री
लता दिदींच्या जाण्यानं एका स्वर युगाचा अंत झाला, एक महान पर्व संपले. आमच्यावरचा मातृतुल्य आशीर्वाद हरपला अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.


स्वरसम्राज्ञी लतादिदी आज आपल्यातून देहाने नाहीशा झाल्या. हे अत्यंत दुःखद आहे. पण त्या त्यांच्या अमृत स्वरांनी अजरामर आहेत, विश्व व्यापून राहिल्या आहेत. त्या अर्थाने त्या आपल्यातच राहतील. अनादि आनंदघन म्हणून त्या स्वर अंबरातून आपल्यावर स्वरअमृत शिंपीत राहतील, अशा शोकमग्न भावनांसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.



संगीतविश्वाला पडलेलं अद्भूत स्वप्न भंगलं - उपमुख्यमंत्री अजित पवार
लतादिदींच्या निधनानं महाराष्ट्र आणि देशातल्या प्रत्येक घरात शोकाकूल वातावरण आहे. संगीत विश्वातला स्वर्गीय सूर हरपला. लतादिदींची गाणी, त्यांचे दैवी सूर हे सूर्य-चंद्र असेपर्यंत राहतील, परंतु लतादिदी आपल्यात नसतील, ही कल्पना सहन होत नाही. लतादिदी अद्वितीय होत्या, अशी गानकोकीळा पुन्हा होणे नाही, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.



संगीत क्षेत्रातील एक स्वर्णिम पर्व संपले  - नाना पटोले
आपल्या स्वर्गीय स्वरांनी भारतीय संगीत क्षेत्राला समृद्ध करणाऱ्या गानकोकीळा, भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनाचे वृत्त सुन्न करणारे आहे. आपल्या सुमधूर आवाजाने त्यांनी संपूर्ण जगातील रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्रातील एक स्वर्णिम पर्व संपले आहे अशा शब्दांत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शोकभावना व्यक्त केल्या आहेत.


संगीत क्षेत्रातील गुरु हरपला - पद्मजा फेणाणी जोगळेकर
लतादीदींना भारतरत्न पुरस्कार मिळाला त्याचवेळी मलाही पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला होता. त्यांना भारतरत्न पुरस्कार घेताना पाहणं हि माझ्यासाठी भाग्याची गोष्ट होती. त्यानंतर माझी नाव जाहीर झालं. पुरस्कार घेण्यापूर्वी मी त्यांना वाकून नमस्कार केला. त्यावेळी त्यांनी पाठीवरून हात फिरविला. तेव्हा मलाच भारतरत्न पुरस्कार मिळाल्याचा आनंद झाला.


लतादीदींसारखे दुसरे कुणी होणार नाही. त्यांची एक घरगुती आठवण आहे. त्यांच्या घरी मी गाणं शिकायला जायचे. एकदा त्यांनी मला त्यांच्या स्वयंपाकघरात नेलं. कांदा, मसाला, तेल असं सगळं साहित्य तेथे तयार होतं. फक्त उकळत्या तेलात सोडलं की सगळं तयार होणार होतं. ही प्रक्रिया म्हणजे गीतकार, संगीतकार यांनी गाणं तयार करणं आणि नंतर ते गाणं आपल्या आवाजात म्हणून ते रसिकांपर्यंत पोहोचवण हे गायकाचं कौशल्य असतं हेच त्यांना मला सांगायच होतं.


त्यानंतर जेव्हा जेव्हा मी त्यांना भेटायचे तेव्हा 'है' अशीच त्यांची प्रतिक्रिया असायची. त्यांच्या अनेक आठवणी आहेत. पण, आमचा संगीत क्षेत्रातील गुरु हरपला या शब्दात त्यांना श्रद्धांजली.. 
      
त्यांची आठवण ठेऊन गाणं ऐकत राहू - आरती अंकलीकर टिकेकर
लतादीदींबद्दल काय बोलू? लताबाई यांना शब्दात उतरणं शक्य नाही. त्यांनी अनेक भाषेत गाणी म्हटली. अन्य भाषेतील गाणी गाणं कठीण असत. पण. साक्षात देवच गाणं गात होता. आपल्या सगळ्यांच्या कानात, मनात लतादीदी आहेत. आता आपण कायम त्यांची आठवण ठेऊन गाणं ऐकत राहू