Digital Rupee : डिजीटल इंडियाच्या (Digital India) संकल्पनेनंतर सध्या सगळीकडेच ऑनलाईन पेमेंटचे (Online Payment) प्रमाण वाढलं आहे. विविध अॅपच्या माध्यमातून सध्या सगळीकडेच ऑनलाईन पेमेंट केले जात आहे. अशातच सरकारकडूनही यासाठी प्रोत्साहन दिलं जात आहे. भारतीय रिझर्व्ह बँकनेसुद्धा (RBI) यासाठी महत्त्वाची पावले उचलली आहेत. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये आरबीआयने किरकोळ बाजारात सेंट्रल बँक डिजिटल करन्सीचा (CBDC) म्हणजेच  ई- रुपीचा पायलट प्रोजेक्ट सुरू केला होता. यामध्ये काही निवडक लोकांचा समावेश करण्यात आला होता. यामध्ये मुंबईतील आरबीयच्या कार्यालयाबाहेर फळांची विक्री करणाऱ्या एका व्यक्तीलाही संधी देण्यात आली आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरबीआयने निवड केलेल्या व्यक्तींमध्ये लाल साहनी यांचाही समावेश आहे. साहनी हे 25 वर्षांपूर्वी बिहारमधून मुंबईत आले होते. आरबीआय मुख्यालयाजवळील मिंट रोडवर लाल साहनी फळे विकतात. आरबीआयने 45 वर्षीय साहनी यांची देशव्यापी पायलट प्रोजेक्टसाठी निवड केली होती. ट्रायल सुरू होऊन एक महिना झाला आहे आणि मला 2-3 व्यवहारांद्वारेचे डिजिटल मनीद्वारे 300 रुपये मिळाले आहेत, असे लाल साहनी यांनी सांगितले.


आरबीआयने केली निवड


"आरबीआय अधिकाऱ्यांनी गेल्या महिन्यात माझ्याशी संपर्क साधला आणि मला डिजिटल रुपयात व्यवहार सुरू करण्यास सांगितले. त्यांनी मला  IDFC First Bankमध्ये डिजिटल वॉलेटसह वेगळे खाते उघडण्यास मदत केली. आता डिजिटल मनीशी संबंधित कोणत्याही व्यवहारावर माझ्या मोबाईलवर मेसेज येतो," असे लाल साहनी यांनी सांगितले.


व्यवहारामध्ये अडचणी


"सुरुवातीला व्यवहारांची संख्या कमी असली तरी रोख आणि UPI व्यतिरिक्त आता दुकानदारांना पेमेंट घेण्याचा दुसरा पर्याय उपलब्ध झाला आहे. मात्र यातही काही अडचणी आहेत. डिजिटल रुपयासह कोणताही व्यवहार उशीरा किंवा अयशस्वी झाल्यास, ग्राहक पैसे देण्यासाठी इतर डिजिटल पद्धती निवडतात. एका ग्राहकाने मला डिजिटल करन्सीद्वारे 50 रुपये दिले होते, पण काही दिवसांनी जेव्हा त्याला पुन्हा डिजिटल पैशाने पेमेंट करायचे होते तेव्हा तो ते करू शकला नाही. याशिवाय, ज्या खात्यात हे पैसे येत आहेत, त्यातून काढण्यासाठी एटीएम कार्ड वापरावे लागते जे सुमारे 3 महिन्यांनंतर येणार आहे," असेही साहनी म्हणाले.