मुंबई : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर ‘ठाकरे’ हा सिनेमा काढला गेला आहे. या सिनेमाचा आज प्रीमियर होता. त्यावेळी दिग्दर्शक अभिजीत पानसे हे संतापाने सिनेमागृहाबाहेर पडले. काही कळायच्या आत पानसे बाहेर पडल्याने एकच गोंधळ झाला. सिनेमाचे निर्माते खासदार संजय राऊत हे लगेच पानसे यांची समजूत काढण्यासाठी सरसावले. मात्र, त्याचा काहीही उपयोग झाला नाही. पानसे हे रागाने सिनेमागृहाबाहेर पडले. मात्र, असं काय झाले की त्यांना एव्हढा राग का आला, याचीच चर्चा सिनेमागृहात सुरु होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

‘ठाकरे’ या सिनेमाचे खास स्क्रिनिंग सुरू होते. यावेळी दिग्दर्शक अभिजीत पानसे हे थोडे उशिरा पोहोचले. त्यावेळी सिनेमागृहात मोठी गर्दी होती. पानसे हे सहकुटुंब सिनेमाच्या स्क्रिनिंगसाठी आले होते. मात्र, त्यांना बसण्यासाठी जागा नसल्याने ते तडकाफडकी उठून गेले, असे काहींचे म्हणणे आहे. तर पानसे हे अपमानित झाल्याने तेथून उठून गेल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, नक्की काय झाले हे कोणीही सांगण्यास तयार नाहीत. दरम्यान, पानसे हे कशामुळे संतापले हे समजू न शकल्याने याची चर्चा अधिक रंगली आहे.


शिवेसना नेते खासदार संजय राऊत यांनी पानसे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जाते. मात्र पानसे आपल्या कुटुंबीयांसह सिनेमागृहातून निघून गेले. मुंबईतील अॅट्रिया सिनेमागृहात सिनेमाचे स्पेशल स्क्रिनिंग सुरू होते.


ठळक घटनाक्रम :


ठाकरे चित्रपटाच्या प्रीमियरमध्ये दिग्दर्शक अभिजीत पानसेंचा संताप 


अभिजीत पानसे संतापाने पडले चित्रपटगृहाबाहेर 


पानसेंच्या कुटुंबीयांनाच बसायला जागा नाही?  


संजय राऊत यांच्याकडून पानसेंची समजूत काढण्याचा प्रयत्न 


ठाकरे चित्रपटाच्या दिग्दर्शकालाच प्रीमियरमध्ये दुय्यम वागणूक?