मुंबई :  कांदिवलीच्या शताब्दी हॉस्पिटलमधून बेपत्ता झालेल्या ८० वर्षीय विठ्ठल मोरे या वृद्धाचा मृतदेह बोरीवली रेल्वे स्टेशनजवळ सापडला. गेल्या काही दिवसांत मुंबईत सहा कोरोना रुग्णांचे मृतदेह गायब होण्याच्या घटना घडल्या असून याची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमैया यांनी केली आहे. तर या प्रकरणाची चौकशी केली जाईल, असं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपचे माजी खासदार किरीट सोमैया यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र लिहून रुग्णालयातून मृतदेह गायब होण्याच्या घटनांकडे लक्ष वेधले आहे. या प्रकरणांत दोषींवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. तसेच भाजप आमदार राम कदम यांनीही या प्रकारांबाबत आवाज उठवला आहे.



सोमैया यांनी लिहिलेल्या पत्रात कोरोना रुग्णांचे मृतदेह गायब झाल्याच्या सहा घटनांचा उल्लेख केला आहे. केईएममधून सुधाकर खाडे यांचा मृतदेह गायब झाला होता. घाटकोपरच्या राजावाडीमधून मेहराज शेख या रुग्णाचा मृतदेह गायब झाला होता. शताब्दी हॉस्पिटलमधून विठ्ठल मोरे हे वृद्ध रुग्ण गायब झाले आणि त्यांचा मृतदेह बोरीवली स्टेशनजवळ सापडला. नायर हॉस्पिटलमधून मधुकर पवार यांचा मृतदेह गायब झाला होता. तर जोगेश्वरीच्या ट्रामा केअर हॉस्पिटलमधून एका वृद्धाचा मृतदेह गायब झाला. सायनमधून ग्यांतीदेवी विश्वकर्मा या रुग्ण महिलेचा मृतदेह कुटुंबीयांना देण्याआधीच अंत्यसंस्कार केले गेले, असं सोमैया यांनी पत्रात म्हटले आहे. यापैकी काही रुग्णांचे मृतदेह काही दिवसांनी रुग्णालयातच सापडले होते.



दरम्यान, शताब्दी हॉस्पिटलमधून कोरोनाबाधित वृद्ध रुग्ण बेपत्ता झाल्यानंतर त्याचा मृतदेह बोरीवली स्टेशनवर सापडला. या घटनेची चौकशी केली जाईल आणि निष्काळजीपणा करणाऱ्या प्रत्येकावर कारवाई केली जाईल, असे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज ‘झी २४ तास’ला सांगितले. अवाजवी बिल आकारणाऱ्या नर्सिंग हॉस्पिटलवरही कारवाई केली जाईल. अँम्ब्युलन्स व्यावसायिकांवरही कारवाई करू, असे महापौर म्हणाल्या.



मुंबईत यंत्रणा सक्षम आहे, पण मुंबईचं वेगळं चित्र रंगवलं जात असल्याचं महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलंय.