शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांवर आज विधिमंडळात चर्चा
विधिमंडळच्या दोन्ही सभागृहात आज महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा अपेक्षित आहे. सोमवारच्या शेतकरी मोर्चाला राज्य शासनाने दिलेले आश्वासन यावर विरोधक दोन्ही सभागृहात मुद्दा उपस्थित करणार आहेत.
मुंबई : विधिमंडळच्या दोन्ही सभागृहात आज महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा अपेक्षित आहे. सोमवारच्या शेतकरी मोर्चाला राज्य शासनाने दिलेले आश्वासन यावर विरोधक दोन्ही सभागृहात मुद्दा उपस्थित करणार आहेत.
विधानसभेत मुंबई विकास आराखडा आणि समस्या यांवर मुख्यमंत्री काय उत्तर देणार? याकडे लक्ष लागलेले असेल. विधानपरिषद मध्ये कोरेगांव - भीमा प्रकरणवरही मुख्यमंत्री सरकारची भूमिका मांडणार आहेत.
विधानसभेत राज्यातील भेसळयुक्त दूधाचा प्रश्न, नागपूर जिल्ह्यातील कुष्ठरोगांचा प्रश्न यांवर लक्षवेधी प्रश्नाच्या माध्यमातून चर्चा होणार आहे तर १३४६ मराठी शाळा बंद करण्याच्या विषयावरून चर्चेदरम्यान विरोधक राज्य सरकारला धारेवर धरणार आहेत.
विधानपरिषदमध्ये पालघर मधील कुपोषित बालकांचा प्रश्न याबाबत लक्षवेधी प्रश्न विचारण्यात आला आहे.
तर नाशिक - नगर जिल्ह्यातील पाणी वाटपाचा वाद या प्रश्नावरून सत्ताधारी - विरोधकच काय स्वपक्षातील आमदार एकमेकांना भिडण्याची शक्यता आहे.
राज्याची आर्थिक परिस्थिती, मुंबई विकास आराखडा यावरून विधान परिषदमध्ये चर्चा अपेक्षित आहे.
शेतकऱ्यांना उत्तर मिळणार?
शेतकरी आणि आदिवासींचं सरकारविरोधात छेडलेलं आंदोलन अखेर मागे घेण्यात आलंय. सरकारनं आंदोलकांना मागण्या पूर्ण करण्याचं लेखी आश्वासन दिल्यामुळे आंदोलन मागे घेण्याचा निर्णय अखिल भारतीय किसान सभेच्या नेत्यांनी घेतला. मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी विधान भवनात तब्बल तीन तास बैठक चालली.
या बैठकीला मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात सहा मंत्र्यांचा गट सामील झाला होता. तर आंदोलकांचे १३ जणांचे शिष्टमंडळ या बैठकीला उपस्थित होते. बैठक संपल्यानंतर आझाद मैदानावर जमलेल्या हजारो आंदोलकांसमोर सरकारनं दिलेलं लेखी आश्वासनाचं वाचन करण्यात आलं.