अमित जोशी, मुंबई :  भाजपचे खासदार नारायण राणे यांनी आज राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी उद्धव ठाकरे सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं. ठाकरे सरकार कोरोनाचा सामना करण्यात अपयशी ठरले आहे. त्यामुळे या सरकारला नारळ द्यावा आणि राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी नारायण राणे यांनी केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपच्या नेत्यांनी याआधी अनेकदा राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेऊन राज्य सरकारविरोधात तक्रारी केल्या होत्या. आज भाजपचे राज्यसभेचे खासदार नारायण राणे यांनी राज्यपाल कोश्यारी यांनी भेट घेतली. भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली.


राज्यातील परिस्थिती दिवसेदिवस गंभीर होत चालली आहे. मुंबई आणि राज्यातील रुग्णालयांची अवस्था दयनिय झाली आहे, याकडे राज्यपाल यांना भेटून त्यांचे लक्ष वेधले असं नारायण राणे यांनी सांगितलं.


महापालिका आणि सरकारची रुग्णालये लष्कराच्या ताब्यात द्यावीत आणि या सरकारला नारळ देऊन राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी नारायण राणे यांनी केली.


पैसे कसे उभे करायला पाहिजेत आणि पोलीस यंत्रणा कशी हलवली पाहिजे यांचे ज्ञान या सरकारला नाही, अशी टीका राणे यांनी केली. नाचता येईना, अंगण वाकडे अशी सत्ताधाऱ्यांची अवस्था आहे, असे राणे म्हणाले.


महाराष्ट्र सरकार आणि रेल्वे मंत्रालय यांच्यात परप्रांतिय मजुरांसाठी रेल्वेगाड्या सोडण्यावरून तूतू- मैमै सुरु आहे. याबाबत रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची पाठराखण करत राणे यांनी ठाकरे सरकारवर टीका केली. पियुष गोयल यांनी काही चुकीचे सांगितले नाही. राज्य सरकार टीका करून मोकळे होतात. आतापर्यंत दिले आहे ते केंद्रानेच दिले आहे, असेही राणे यांनी सुनावले.



कोकणासाठी जेवढं आमच्या परीने करता येईल, तेवढे आम्ही करत आहोत, असं राणे यांनी सांगितलं.