मुंबई : राज्यातील  ५२ हजार ४४० स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु आहे १ जून ते २३ जून पर्यंत राज्यातील १ कोटी २४ लाख ६६ हजार १२२ शिधापत्रिका धारकांना ४७ लाख ९३ हजार ६९० क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्यात आले तसेच २३ लाख ६० हजार ६८४ शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात १ जून ते २३ जून पर्यंत ८५१  शिवभोजन केंद्रातून पाच रूपये प्रति थाळी याप्रमाणे २३लाख ६० हजार ६८४ शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यात आले आहे. तसेच एप्रिल ते जून या कालावधीत ८१ लाख ४४ हजार ४६१शिवभोजन थाळ्या वाटप झाल्या आहेत. दरम्यान, राज्यातील स्वस्त धान्य दुकानांतून सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या अन्नधान्याचे वाटप सुव्यवस्थितरित्या होत असल्याबाबत संनियंत्रण करण्यात येत असून, काळाबाजार करणाऱ्या स्वस्त धान्य  दुकानदारांवर कारवाई करण्यात येत आहे, अशी माहिती मंत्री भुजबळ यांनी दिली.



राज्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी असे दोन्ही रेशनकार्डमधील पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे ७ कोटी आहे.  या लाभार्थ्यांना५२ हजार ४४० स्वस्त धान्य दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ दिला जातो. राज्यात या योजनेमधून सुमारे १७ लाख चार हजार २१३ क्विंटल गहू, १३ लाख तीन हजार ८३४ क्विंटल तांदूळ, तर ८७हजार सहा क्विंटल साखरेचे वाटप करण्यात आले आहे. त्याचबरोबर स्थलांतरीत झालेले परंतु लॉकडाऊनमुळे राज्यात अडकलेल्या सुमारे ३ लाख ७ हजार १८० शिधापत्रिका धारकांनी ते जेथे राहत आहे त्याठिकाणी शासनाच्या पोर्टबिलीटी यंत्रणेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अन्नधान्य घेतले आहे.


प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत एप्रिल ते जून पर्यंत प्रती लाभार्थी प्रती महिने ५ किलो तांदूळ मोफत देण्याची योजना आहे.  १ जूनपासून एकूण ६२ लाख ८९ हजार ४६४ रेशनकार्डवर मोफत तांदूळ वाटप केले आहे. या रेशनकार्डवरील दोन कोटी ८२ लाख६९ हजार ३६२ लोकसंख्येला १४ लाख १३ हजार ४७० क्विंटल तांदळाचे वाटप झाले आहे.   


राज्य शासनाने कोविड-१९ संकटावरील  उपाययोजनेसाठी ३ कोटी ८ लाख ४४ हजार ०७६ एपीएल केसरी लाभार्थ्यांना मे व जून २०२० या २ महिन्यासाठी प्रती व्यक्ती ५ किलो धान्य सवलतीच्या दराने (गहू ८ रुपये प्रति किलो व तांदूळ १२ रुपये प्रति किलो) देण्याचा निर्णय घेतला आहे. या धान्याचे जून २०२० मध्ये आतापर्यंत ३ लाख २५ हजार६० क्विंटल वाटप केले आहे.


प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेत प्रती रेशनकार्ड १ किलो मोफत डाळ (तूर किंवा चणा डाळ) देण्याची तरतूद आहे. या योजनेतून सुमारे २ लाख ३ हजार १७९ क्विंटल डाळीचे वाटप केले आहे.  ‘आत्मनिर्भर भारत’ या योजनेच्या अन्नधान्य लाभ मे व जून २०२० या दोन महिन्यासाठी असून त्या अंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेमध्ये समाविष्ट नसलेल्या विनाशिधापत्रिका धारकांना प्रती व्यक्ती पाच किलो मोफत तांदुळ दिला जात आहे आतापर्यंत ४७ हजार ११०क्विंटल मोफत तांदूळ वितरित केला आहे.