मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत स्वबळावरून कुरबुरी सुरू झाल्यात. काँग्रेस नेत्यांनी स्वबळाचा नारा दिल्यानंतर महाविकास आघाडीला सुरूंग लागतो की काय? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागलीय. त्यात मुख्यमत्र्यांनीही मौन सोडत काँग्रेसची कडक शब्दात कानउघाडणी केली आहे. त्यानंतर काँग्रेस काहीशी बॅकफुटवर गेलीय


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेसची सावध भूमिका
काँग्रेसनं काहीशी सावध भूमिका घेतलीय. आम्ही सत्तेत 5 वर्ष एकत्र राहू, पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच लढवू असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलंय. “काँग्रेस पक्ष उद्धव ठाकरेंसोबत पूर्ण ताकदीनिशी आहे. काँग्रेसकडून कोणतीही अडचण येणार नाही याची ग्वाही सोनिया गांधींनी दिली आहे”, असंही ते म्हणाले आहेत.


उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले होते?
अनेक जण स्वबळाचा नारा देत आहेत. स्वबळ म्हणजे केवळ एकट्याने निवडणूक लढणं असं नाही. त्यासाठी ताकद लागते. स्वाभिमान लागतो, असं सांगतानाच कोरोनाचं संकट आहे. अशा वेळी स्वबळाचा नारा दिला, एक हाती सत्ता आणू म्हटलं तर लोक तुम्हाला जोड्याने हाणतील, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.


संजय राऊत यांचाही काँग्रेसला टोला
या भूमिकेवरून शिवसेनेनं काँग्रेसला चिमटा काढण्याची संधी साधलीय. 'राज्यातील अनेक राजकीय पक्ष स्वबळावर लढण्याची भाषा करत आहेत. हा ज्याचा-त्याचा प्रश्न आहे. पण त्या पक्षातील एक नेता स्वबळाची भाषा करतो आणि दुसरा नेता त्यास आक्षेप घेतो. हा एक प्रकारचा गोंधळ आहे. कुठलाही भ्रमात राहता कामा नये. त्यामुळं त्या सगळ्यांनी आधी त्या गोंधळातून बाहेर यावं, त्यानंतर स्वबळाच्या संदर्भात निर्णय घ्यावा,' असं राऊत म्हणाले आहेत.


'तर राष्ट्रवादी शिवसेनेसोबत'
महाविकास आघाडी सरकारमध्ये तीन पक्ष आहेत. त्या तिघांनी एकत्रित राहावं याला सर्वांनीच प्राधान्य द्यायला हवे. त्यातही एखाद्या पक्षाला स्वबळावर लढण्याची इच्छा असेल तर मात्र उरलेले दोन पक्ष नक्कीच एकत्रित राहतील. महाराष्ट्रातील जनतेचीही तशीच इच्छा दिसते, असं स्पष्ट मत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केलं आहे.


राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारला दीड वर्षं पूर्ण झालीयत. पण या तीन चाकी संसारगाड्यात काँग्रेसची अस्वस्थता शिवसेनेसाठी चिंतेचा विषय बनलीय. 5 वर्ष सत्तेत राहण्याचा विश्वास दाखवून काँग्रेसनं शिवसेनेला आश्वस्त केलंय. पण स्थानिक स्वराज्य संस्थांमधील स्वबळाची भाषा सत्तेचा डोलारा डळमळीत करण्यासाठी पुरेशी ठरू शकते.