एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीसाठी सरकार तयार - रावते
पगारवाढीसाठी सरकार तयार आहे. हट्ट सोडा. तुम्ही लढा द्या मात्र, ऐन दिवाळीत अन्नदात्याचे हाल करू नका. कामावर परत या, असे अवाहन राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी एसटी कर्मचाऱ्यांना केले आहे.
मुंबई : पगारवाढीसाठी सरकार तयार आहे. हट्ट सोडा. तुम्ही लढा द्या मात्र, ऐन दिवाळीत अन्नदात्याचे हाल करू नका. कामावर परत या, असे अवाहन राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी एसटी कर्मचाऱ्यांना केले आहे.
दरम्यान, एसटी कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम असून, त्यांनी राज्य सरकारचा इशारा धुडकाऊन लावला आहे. त्यामुळे संप सुरूच असून, संपाचा आजचा दुसरा दिवस आहे. त्यातच दिवाळीचा सण असल्यामुळे संपाची तीव्रता अधिक जाणवत आहे. राज्यातील नागरीक आणि दिवाळीच्या सुट्टीनिमीत्त प्रवास करत असलेल्या प्रवाशांना या संपाचा चांगलाच फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना रावते यांनी कर्मचाऱ्यांना अवाहन केले आहे. कर्मचाऱ्यांना अवाहन करताना एसटी कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या आम्हाला मान्य आहेत. पगार वाढ करण्यासाठी सरकार तयार आहे. मात्र, कर्मचाऱ्यांनी आपला हट्ट सोडावा. कारण, कर्मचाऱ्यांना बोनस देता येण्यासारखी स्थिती याच वर्षी नव्हे तर, पुढच्या पंचवीस वर्षातही निर्माण होण्यासारखी नाही. त्यामुळे काही मुद्द्यांवर पाठीमागे येत कर्मचाऱ्यांनी कामावर रूजू व्हावे, असे रावते यांनी म्हटले आहे.
दरम्यान, सरकारच्या अवाहनाला पठिंबा देत कर्मचारी जर कामावर हजर झाले नाहीत तर, सरकारपुढे इतर पर्याय उपलब्ध आहेत. कारवाईचा मुद्दा हा नंतरचा भाग आहे. मात्र, नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी सरकार कायद्याचा वापर करत खासगी बसेस अधिगृहीत करेल. त्याद्वारे नागरिकांना प्रवासासाठी सुविधा उपलब्ध करून दिली जाईल, असा इशाराही रावते यांनी या वेळी दिला आहे. तसेच, कंत्राटी कर्मचाऱ्यांना घेऊन एसटी सेवा सुरू करण्यात येईल असंही सरकारनं स्पष्ट केलं आहे.