मुंबई : अवघ्या तीन दिवसाच्या उपमुख्यमंत्री पदाचा अजित पवारांनी राजीनामा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला बुधवारीच बहुमत चाचणी देण्याचे आदेश दिले होते. या पार्श्वभूमीवर बहुमत नसल्याने उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी राजीनामा दिला आहे. अजित पवारांची मनधरणी करण्याचा गेल्या तीन दिवसांपासून राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांकडून प्रयत्न सुरू होता. यावेळी अजित पवारांनी,'मी राष्ट्रवादीत येईन पण राजकारणातून सन्यास घेईन', असं वक्तव्य केल्याचं सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अजित पवार राजकीय कारकिर्दीतला सर्वात मोठा निर्णय घेणार का? याकडे सगळ्यांच लक्ष लागून राहिलं आहे. अजित पवारांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्या राजीनाम्यापूर्वी अजित पवारांनी आपल्या कुटुंबीयांशी संवाद साधला होता. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्रकारपरिषदेत यासंदर्भात सविस्तर माहिती दिली होती. 


यावेळी त्यांनी काकांवर (शरद पवार) गुन्हा दाखल झाल्याने आपण अस्वस्थ झाल्याचे म्हटले. सध्याच्या राजकारणाची पातळी अत्यंत खालावली आहे. त्यामुळे आपण यामधून बाहेर पडलेले बरे, त्याऐवजी आपण शेती किंवा उद्योग करू, असे अजित पवार यांनी आपल्या मुलाला म्हटले होते. 


मी इतकी वर्षे सहकारी संस्थांमध्ये काळजीपूर्वक काम केले आहे. त्यामुळे मला चौकशीची चिंता नाही. मात्र, तब्बल ५० वर्षे महाराष्ट्राच्या राजकारणात काम केलेल्या काकांना (शरद पवार) त्यांचा कोणताही सहभाग नसतानाही राज्य सहकारी बँकेच्या चौकशीत गोवण्यात आले होते. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही गोष्ट मला (अजित पवार) सहन होत नाही. त्यामुळे आपण या राजकारणातून बाहेर पडलेले बरे, असे उद्विग्न उद्गार अजित पवारांच्या तोंडातून त्यावेळी बाहेर पडल्याचे शरद पवार यांनी सांगितले होते. 


आजही तशीच काहीशी परिस्थिती अजित पवारांवर उद्भवली आहे. या सर्व घडामोडींनंतर अजित पवार पुन्हा राष्ट्रवादीत जाणार की सन्यास घेणार? याकडे महाराष्ट्राच्या जनतेचं आणि राजकीय मंडळींच लक्ष लागून राहिलं आहे.