आतिश भोईर, झी मीडिया, डोंबिवली : महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असताना डोंबिवलीतून (Dombivli Crime) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. डोंबिवलीत एका 29 वर्षीय तरुणाने इन्स्टाग्रामवर (Instagram) मैत्री करुन 14 वर्षीय अल्पवयी मुलीवर अत्याचार केला आहे. पोलिसांनी (Dombivli Police) या प्रकरणी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे. आरोपीने इन्स्टाग्रामद्वारे मुलीशी ओळख करून तिच्यावर लैंगिक अत्याचार (physicaly assault) केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याप्रकरणी डोंबिवली टिळकनगर पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपी काशिनाथ पाटील याला अटक केली आहे. काशिनाथ हा डोंबिवली पूर्वेतीलच त्रिमूर्ती नगर झोपडपट्टीत राहण्यास आहे. सोमवारी दुपारी अल्पवयीन मुलगी घरातून बाहेर पडली आणि ती पुन्हा घरीच आली नाही. रात्रभर तिची वाट बघितल्या नंतरही मुलगी घरी न आल्याने कुटुंबीय चिंतेत होते. अल्पवयीन मुलगी घरी न आल्याने तिच्या आजीने टिळक नगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. मुलगी हरवल्याची तक्रार आजीने पोलीस ठाण्यात दाखल केली.


टिळक नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक एम. पी. मुंजाळ यांच्या पथकाने मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली. परिसरातील तसेच स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता मुलगी डोंबिवली स्टेशन परिसरात जाताना आढळून आली. त्यानुसार पोलिसांनी शोध घेतला असता बुधवारी रात्री मुलीचा शोध लागला. मुलीला वैद्यकीय तपासणी करता शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल केले. तपासणीमध्ये मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे पुढे आले. पोलिसांनी सखोल चौकशी केली असता मुलीने तिच्यासोबत घडली हकीकत सांगितली. साधारण वर्षभरापूर्वी आरोपी काशिनाथ यांच्याशी मुलीची इन्स्टाग्रामवर ओळख झाली होती. या ओळखीतूनच आरोपीने मुलीला फुस लावत तिच्यासोबत लैंगिक अत्याचार केला आहे.


पोलिसांनी काय सांगितले?


"अल्पवयीन पीडित मुलीसोबत इन्स्टाग्रामवर मैत्री करुन आरोपीने तिच्यासोबत अनैतिक लैंगिक कृत्य केले आहे. याप्रकरणी बलात्कार आणि पॉस्को कलमांखाली आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक केली असून त्याला पाच दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. काशिनाथ रमेश पाटील असे आरोपीचे नाव आहे," अशी माहिती टिळक नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत बोराटे यांनी दिली.