आतिष भोईर, झी मीडिया, कल्याण : दुचाकीला कट मारत कर्कश हॉर्न वाजवल्याचा जाब विचारला म्हणून  संतापलेल्या तरुणाने महिलेला बेदम मारहाण (Crime News) केल्याची घटना डोंबिवली (dombivli) पूर्व ग्रामीण भागात घडली आहे. आरोपी तरुणाने बेदम मारहाण केल्याने महिलेला थेट रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पीडित तक्रारदार महिला मुलासह ग्रामीण भागातून दुचाकीने जात होती .यावेळी पाठीमागून कारने येणारा तरुण सातत्याने कर्कश हॉर्न वाजवत होता .त्यानंतर या तरुणाने महिलेच्या दुचाकीला कट मारली. त्यामुळे महिलेच्या पायाला लागले. संतापलेल्या महिलेने तरुणाला जाब विचारला. यावरुन महिला आणि तरुणामध्ये वाद झाला. यानंतर संतापलेल्या तरुणाने महिलेला लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.


या मारहाणीत महिलेला गंभीर दुखापत झाली असून तिच्यावर डोंबिवली येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या करणारा नितेश उर्फ गोटया भोईर या तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.


नेमकं काय झालं?


"मी लग्नाला जात होते तेव्हा पाठीमागून भरधाव कार घेऊन एक मुलगा आला. त्याने मला कट मारुन गेल्यानंतर मी त्याला शिव्या घातल्या. त्यानंतर त्याने माझ्यापुढे कार थांबवून कोणाला शिव्या दिल्या असे विचारले. यावर मी तुलाच शिव्या दिल्या असे म्हटले. त्यानंतर त्याने मला मारहाण करायला सुरुवात केली. एक चापट मारल्यानंतर मी खाली पडले. त्यानंतर मी उठून त्याला चापट मारली. त्यावर मला मारहाण केल्याने मी गाडीवर फटका दिला तर काच फुटली. त्यानंतर रागाच्या भरात त्याने आणखी मारहाण करायला सुरुवात केली," अशी माहिती पीडित महिलेने दिली.