डोंबिवलीत आग लागलेल्या `त्या` कंपनीला प्रदूषण नियंत्रण मंडळाची नोटीस, उत्पादन बंद करण्याचे आदेश
या कंपनीच्या शेजारी असलेल्या ज्या कंपन्या बाधित झाल्या आहेत, त्या चार कंपनी मालकांनी स्वत:हून उत्पादन प्रक्रिया बंद करावी, असेही या नोटीसमध्ये बजावण्यात आले आहे.
Dombivli MIDC Blast Fire : डोंबिवलीतील एमआयडीसी परिसरातील अमुदान या केमिकल कंपनीत गुरुवारी बॉयलरचा भीषण स्फोट झाला. यात 8 कामगारांचा मृत्यू झाला होता. तर 60 हून अधिक कामगार जखमी झाले आहेत. या स्फोटाने तीन ते चार किलोमीटरचा परिसर हादरला. या स्फोटाप्रकरणी कंपनीच्या मालक मालती मेहता यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर आता अमूदान कंपनीला एमपीसीबीद्वारे क्लोजर नोटीस देण्यात आली आहे.
डोंबिवली स्फोटाच्या घटनेनंतर अमूदान कंपनीला एमपीसीबी क्लोजर नोटीस देण्यात आली आहे. डोंबिवलीतील अमूदान कंपनीत झालेल्या भीषण स्फोटानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. या घटनेची गंभीर दखल घेत एमपीसीबीच्या कल्याण प्रादेशिक कार्यालयाने अमूदान कंपनीला क्लोजर नोटीस बजावली आहे. या कंपनीने उत्पादन प्रक्रिया बंद करावी असे या नोटीसमध्ये म्हटले आहे.
त्यासोबतच या कंपनीच्या शेजारी असलेल्या ज्या कंपन्या बाधित झाल्या आहेत, त्या चार कंपनी मालकांनी स्वत:हून उत्पादन प्रक्रिया बंद करावी, असेही या नोटीसमध्ये बजावण्यात आले आहे.
नेमकं काय घडलं?
डोंबिवली एमआयडीसी फेज दोन मधील अमुदान या केमिकल कंपनीत मोठा स्फोट झाला. या स्फोटानंतर लागलेल्या आगीत ही कंपनी भस्मसात झाली. या स्फोटाने तीन ते चार किलोमीटरचा परिसर हादरला. यात आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला होता. तर 60 हून अधिक जण जखमी झाले होते. सध्या जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहे. या घटनेनंतर मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून प्रत्येकी पाच लाखांच्या मदतीची घोषणा करण्यात आली. तसेच जखमी असलेल्या व्यक्तींचा खर्चही सरकारद्वारे करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली होती.
डोंबिवली एमआयडीसी केमिकल कंपनीत बॉयलरचा स्फोट झाल्यानंतर कंपनीच्या मालकावर गुन्हा दाखल कऱण्यात आला होता. यानंतर पोलिसांनी कारवाई करत कंपनीच्या मालक मालती मेहता यांना नाशिकमधून अटक केली आहे. कंपनीत बॉयलरचा स्फोट झाल्याची दुर्घटना घडल्यानंतर कंपनीच्या मालक मालती मेहता या नाशिकमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर नाशिक पोलीस आणि ठाणे क्राईम ब्रांचच्या पोलिसांनी सयुक्त कारवाई करत कारवाई केली. त्यांना ठाणे पोलिसांकडे सोपवण्यात येणार असून घटनेची चौकशी करण्यात येणार आहे.