Viral Video : कष्ट, संघर्ष कोणालाही चुकलेला नाही. पण, अनेकांच्या जीवनात संघर्षाचा हा टप्पा इतका मोठा असतो, की पाहणाऱ्यांचंही मन हेलावतं. पण, दिवस येतात आणि जातात त्याचप्रमाणं परिस्थितीसुद्धा बदलते हे मात्र नाकारता येत नाही. याचीच प्रचिती देणारा एक सुरेख व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. बऱ्याचदा वाईट गोष्टीच दाखवल्या जातात असं म्हणत सोशल मीडियाला दुषणं लावणारी मंडळीसुद्धा हा व्हिडीओ पाहून भावूक होताना दिसत आहेत. कारण, या व्हिडीओमध्ये प्रत्येक मध्यमवर्गीय जणू स्वत:ला पाहत आहे. प्रत्येकाला आपला संघर्ष, यश आणि अर्थात आईनं मारलेली मिठी आठवत आहे. 


भाजीवाल्या काकूंचा मुलगा झाला CA 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

द इन्स्टीट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंट्स ऑफ इंडिया (ICAI) च्या वतीनं 11 जुलै 2024 रोजी CA Final आणि CA Inter Exams 2024 चा निकाल जाहीर केला. मे महिन्यात घेण्यात आलेल्या या परीक्षेमध्ये अनेकजण उत्तीर्ण झाले. पण, यामध्ये डोंबिवलीच्या योगेश ठोंबरे या तरुणाचं यश अधिक खास होतं. त्यामुळं निकाल जाहीर झाला तेव्हा त्याच्याही आनंदाला पारावार उरला नव्हता. 


अनेक परीक्षार्थींची नजर ज्या निकालाकडे लागली होती, ज्या परीक्षेसाठी अनेकांनीच प्रचंड मेहनत घेत दिवसरात्र एक करून अभ्यास केला होता अशा सर्वांचं लक्ष या निकालाकडे लागलं होतं. अखेर तो क्षण आला आणि निकाल जाहीर झाला. आपण परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्याचं कळताच योगेशनं आनंदाच्या भरात आई जिथं भाजी विक्रीसाठी बसते ते ठिकाण गाठलं आणि तिथं तिला ही आनंदाची बातमी दिली. 


हेसुद्धा वाचा : India Post GDS Recruitment : भारतीय पोस्ट विभागात बंपर भरती, 44 हजार तरुणांना नोकरीची सुवर्णसंधी; कसा भरायचा अर्ज?



बस्स, पुढं काय? पुढं बोलण्यासारखं काही नव्हतंच. कारण आईचे अश्रू, लेकाच्या चेहऱ्यावरील आनंद आणि त्यांच्या कष्टाचं झालेलं चीजच सर्वकाही बोलून गेलं. आईला लेकाच्या यशाची माहिती मिळताच तिनं त्याला घट्ट मिठी मारली आणि नकळत डोळ्यातून आसवं घरंगळू लागली. अतिशय सुरेख असे हे क्षण पाऊन आपल्या आईनं मारलेली मिठी अनेक नेटकऱ्यांना आठवली. 


योगेश ठोंबरेनं मिळवलेल्या या यशाबद्दल आणि त्याच्या आईनं घेतलेल्या मेहनतीबद्दल सध्या या मायलेकांवर सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे. योगेश डोंबिवलीच्या गांधीनगर परिसरात गेल्या 20 ते 25 वर्षांपासून राहतो. त्याची आई निरा ठोंबरे भाजी विक्रीचं काम करते. वडिलाचं निधन झाल्यानंतर योगेशच्या आईनं मोठ्या काबाडकष्टानं त्याला वाढवलं, शिक्षण दिलं. 


आईच्या कष्टाला योग्य न्याय देत लेकानंही सीएसारखी अवघड परीक्षा उत्तीर्ण होत त्याच्या मायमाऊलीला आयुष्यभराचा आनंद दिला. महाराष्ट्र लोकनिर्माण विभाग मंत्री रवींद्र चव्हाण यांनीसुद्धा सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर करत योगेशचं कौतुक केलं. 



'योगेश, तुझा अभिमान आहे. डोंबिवली पूर्व येथील गांधीनगर मधील गिरनार मिठाई दुकानाजवळ भाजी विकणाऱ्या ठोंबरे मावशींचा मुलगा योगेश चार्टर्ड अकाऊंटंट (C.A.) झाला.  निश्चय, मेहनत आणि परिश्रमांच्या बळावर योगेशने खडतर परिस्थितीशी तोंड देत हे दैदीप्यमान यश मिळवलं आहे. त्याच्या या यशामुळे आलेले मावशींचे आनंदाश्रू लाखमोलाचे आहेत', असं त्यांनी या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये म्हटलं.