मुंबई : मोस्ट वॉण्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊदबाबत (Dawood Ibrahim) अनेक अफवा पसरत असतात. कधी दाऊद अंथरूणाला खिळलाय, तर कधी दाऊद जिवंतच नसल्याचं सांगितलं जात. मात्र. आता खुद्द दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरनं डी कंपनीबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दाऊद केवळ फिटच नाही तर पाकिस्तानातील आपल्या अपार्टमेंटमध्ये दररोज बॅडमिंटन खेळतो. ड्रग्ज रॅकेटप्रकरणी एनसीबीकडून (NCB) इक्बाल कासकरची (Iqbal Kaskar) सध्या तुरूंगात चौकशी सुरू आहे. या चौकशीदरम्यान ड्रग्ज तस्करीचं डी कंपनी (D Company) कनेक्शन उघड झाल्यानंतर ही माहिती बाहेर आल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. त्यामुळे दाऊद अजूनही पाकिस्तानच्या जीवावर मौजमजा करत असल्याचं उघड झालंय.


तीन दशकांहून अधिक काळ भारतासाठी मोस्ट वॉन्टेड असलेला डॉन दाऊद इब्राहिम पाकिस्तानमध्ये लपून बसलाय. इकबाल कासकरच्या चौकशीत डी कंपनीच्या अंमली पदार्थाच्या सिंडिकेटसंदर्भातील अनेक महत्त्वाच्या बाबी समोर आल्या आहेत. गेल्या काही दिवसांत एनसीबीने ड्रग्स तस्करांना अटक केली होती. यात शब्बीर उस्मान शेख या तस्काराचाही सहभाग होता. एनसीबीच्या माहितीनुसार शब्बीर इक्बाल कासकरच्या मर्जीतला आहे. तसंच तीन दिवसांपूर्वी हुसैन बी नावाच्या महिलेलाही अटक करण्यात आली होती. या महिलेबद्दलची माहितीही इकबाल कासकर याच्याकडून मिळाली होती. हुसैन बी हिच्याकडून एक करोड रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. 


एनसीबीच्या माहितीनुसार डी कंपनी वेगळ्या-वेगळ्या मार्गाने मुंबईत ड्रग्सचा पुरवठा करते. यातलीच एक मार्ग म्हणजे जम्मू-काश्मिरमधून अंमली पदार्थ अजमेरला पाठवले जातात. त्यानंतर अजमेरहून दिल्ली आणि दिल्लीहून मुंबईला आणले जातात. याच मार्गाने मुंबईत आलेल्या तब्बल 9 कोटी रुपये किंमत असलेला 17 किलो हशीश एनसीबीने जप्त केला होता. याप्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली होती. 


मुंबईतील अंमली पदार्थांच्या तस्करीत दाऊदचा हात असल्याचं एनसीबीच्या तपासात समोर आलं आहे. यात छोटा शकीलची भूमिका महत्वाची आहे. याशिवाय एनसीबी दहशतवादी कनेक्शनच्या दृष्टीनेही याप्रकरणाचा तपास करत आहे. अंमली पदार्थांच्या विक्रितून मिळालेली रक्कम दहशतवादी कारवायांसाठी वापरला जातो का? यादृष्टीनेही एनबीसी तपास करत आहे.