नवी मुंबई: नागरिकांनी एखाद्या भावनिक लाटेवर स्वार होऊन नव्हे तर राजकीय पक्षांचे काम पाहून मतदान करावे, असे आवाहन मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केले. ते सोमवारी मनसेच्या १४ व्या वर्धापनदिन सोहळ्यात बोलत होते. यावेळी राज ठाकरे यांनी सरकारवर वचक ठेवण्यासाठी मनसेच्या शॅडो कॅबिनेटची घोषणा केली. हे शॅडो कॅबिनेट सरकारचे वाभाडे काढण्यासाठी तयार केले आहे. मात्र, सरकारने एखादी चांगली गोष्ट केल्यास आम्ही अभिनंदनही करू, असे राज ठाकरे यांनी सांगितले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी राज ठाकरे यांनी मनसेच्या गेल्या १४ वर्षातील वाटचालीसंदर्भात भाष्य केले. १४ वर्षांच्या काळात मनसेचे १३ नगरसेवक आणि अनेक नगरसेवक निवडून आले. मात्र, त्याचे पुढे काय झाले, असा प्रश्न मला अनेकांकडून विचारला जातो. मात्र, देशात तब्बल ५०-६० वर्षे राज्य करणाऱ्या काँग्रेसची आज काय अवस्था आहे? अनेक राज्यांमध्ये भाजपची अवस्थाही वाईट आहे. मात्र, त्याबद्दल चर्चा होत नाही. केवळ आम्हालाच प्रश्न विचारले जातात. भारतात अशा अनेक राजकीय लाटा येत असतात. यामध्ये अनेक राजकीय पक्षांना धक्के बसले आहेत. परिणामी गोष्टी या वरखाली होत असतात, असे राज ठाकरे यांनी म्हटले. तसेच माझ्यावर टीका करणाऱ्यांनी एकदा माझ्या चपलेत पाय घालून पक्ष चालून दाखवावा, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.


पाहा असं असेल राज ठाकरेंचं शॅडो कॅबिनेट


तसेच अलीकडच्या काळात जनमानसाचा नेमका अंदाज येत नसल्याचे त्यांनी सांगितले. लोकांचं काही कळत नाही. कामाच्या आधारे मतदान होते का, हा प्रश्न मला अनेकदा पडतो. त्यामुळेच आता मतदान कामाच्या आधारे होते, भावनांवर होत नाही, हे लोकांनीच दाखवून दिले पाहिजे, असे राज यांनी सांगितले. 


आदित्यची 'शॅडो' होणार अमित ठाकरे; सांभाळणार 'या' खात्याची जबाबदारी


मी सत्तेत नसूनही लोक माझ्यावर टीका करतात. याचे कारण विचारल्यावर आम्हाला तुमच्याकडूनच अपेक्षा आहेत, असे सांगितले जाते. परंतु, मनसेचा इतक्यांदा पराभव होऊनही राज ठाकरे यांच्यासोबत इतके लोक कसे, असा प्रश्न प्रसारमाध्यमांनाही पडतो. त्यामुळे १४ वर्षांच्या चढउताराच्या काळात मला साथ देणाऱ्या कार्यकर्त्यांचे मी आभार मानतो, असे राज यांनी सांगितले.