दिशा सालियानच्या आई, वडिलांनी घातली महापौरांना भावनिक साद, म्हणाल्या...
दिशा गेली. त्या दुःखातून सावरण्याचे प्रयत्न करत आहोत. पण, काही जण याचे राजकारण करत आहेत. पुन्हा, तेच तेच आरोप करून आमच्या मुलीला बदनाम करण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला
मुंबई : दिशा गेली. त्या दुःखातून सावरण्याचे प्रयत्न करत आहोत. पण, काही जण याचे राजकारण करत आहेत. पुन्हा, तेच तेच आरोप करून आमच्या मुलीला बदनाम करण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला, असा सवाल करतानाच आम्हाला परेशान करू नका, आम्हाला जगू द्या अशी भावनिक साद दिशा सालियानची आई वसंती सालियान यांनी घातली.
राज्य महिला आयोगाच्या दोन सदस्या आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिशा सालियान हिच्या कुटुंबीयांची भेट घेतली.त्यावेळी त्या बोलत होत्या.
महापौर किशोरीताई आल्या. त्यामुळे आम्हाला थोडा दिलासा मिळाला आहे. दिशांच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी पाच वेळा तपास केला. आता कुठे आम्ही त्या दुःखातून सावरत आहोत. आता पुन्हा तिला बदनाम करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. हा हक्क त्यामाना कुणी दिला असा सवाल दिशाच्या आईने केला.
आमचे दुःख समजून घ्या. आम्हाला सुखाने जगू द्या. ती जिथे आहे तिथे तिला त्रास होईल असे वागू नका. पुन्हा तेच प्रकरण काढल्याचा त्रास आम्हाला होतोय. यातून माझ्या जीवाचे काही बरंवाईट झाल्यास त्याची जबाबदारी आरोप करणाऱ्यांवर असेल असेही वसंती सालियान म्हणाल्या.