`भ्रष्टाचाराशी जोडलेला `कॅन्सर` शब्द काढून टाका`
पंजाब नॅशनल बॅंकेचे चेअरमन सुनील मेहतांनी नीरव मोदी स्कॅमची तूलना कॅन्सरशी केली आहे, त्यामुळे डॉ. शांता नाराज आहेत.
मुंबई : प्रसिद्ध कॅन्सरतज्ज्ञ डॉ. व्ही शांता यांनी नीरव मोदीच्या मुद्यावरून, देशातील पंजाब नॅशनल बॅंकेचे अध्यक्ष सुनील मेहता यांनी केलेल्या वक्तव्यावर नाराज आहेत. पंजाब नॅशनल बॅंकेचे चेअरमन सुनील मेहतांनी नीरव मोदी स्कॅमची तूलना कॅन्सरशी केली आहे, त्यामुळे डॉ. शांता नाराज आहेत.
सुनील मेहतांना लिहिलं पत्र
भ्रष्टाचाराची तुलना कॅन्सशी केल्याने एक खरमरीत पत्र, पद्मभूषण पुरस्कार विजेत्या डॉ. व्ही शांता यांनी पंजाब नॅशनल बॅंकेचे चेअरमन, सुनील मेहता यांना लिहिलं आहे.
आर्थिक घोटाळ्याची तुलना कॅन्सरशी
या पत्रात डॉ. व्ही शांता म्हणतात, तुम्ही आर्थिक घोटाळ्याची तूलना कॅन्सरशी केलीत, यामुळे मला खूप दु:ख झालं आहे, भ्रष्टाचार एक गुन्हा आहे, पण कॅन्सर हा गुन्हा नाही.
अनेक रुग्ण चांगलं आयुष्य जगतायत
आमच्या रुग्णालयात कॅन्सरवर उपचार घेणारे, अनेक रुग्ण चांगलं आयुष्य जगतायत, त्यामुळे कॅन्सर या शब्दाची तूलना होपलेसनेस, गिल्ट यांच्याशी होऊ नये.
भ्रष्टाचाराशी जोडलेला कॅन्सर शब्द काढून टाका
कॅन्सरला कधीही भ्रष्टाचाराशी जोडू नका, पीएनबी बॅंकेचे चेअरमन सुनील मेहतांना लिहीलेल्या पत्रात डॉ. व्ही शांता पुढे म्हणतात, मी तुम्हाला विनंती करते की भ्रष्टाचाराशी जोडलेला कॅन्सर हा शब्द तुम्ही काढून टाकावा.
माझी इतरांनाही विनंती आहे की कॅन्सर या शब्दाचा गैरवापर थांबवा. मला खात्री आहे की कॅन्सर या विषयात काम करणारे माझे इतर सहकारी माझ्या या मताशी सहमत असतील.