यंदाच्या वर्षी `स्कूल नही चले हम`; मुंबईतील शाळांबाबत मोठा निर्णय
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत येणाऱ्या सर्व शाळा
मुंबई : दिवाळीनंतर राज्यातील शाळा सुरु होणार अशा चर्चा सुरु असतानाच किंबहुना काही शाळांनी यासाठी तयारीही केलेली असताना मुंबईतील शाळांबाबत अत्यंक महत्त्वाचा आणि तितकाच मोठा निर्णय समोर आला आहे. मुंबईत मागील काही दिवसांपासून पुन्हा एकदा वाढणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या पाहता परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत येणाऱ्या सर्व शाळा तूर्तास बंदच ठेवण्यात येणार आहेत.
31 डिसेंबर म्हणजेच यंदाच्या वर्षअखेरीपर्यंत शाळा बंदच राहतील. यासंदर्भातील आदेश पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी काढले आहेत. परिणामी किमान यंदाच्या वर्षी तरी मुंबईतील विद्यार्थी शाळेच्या वाटेवर जाणार नाहीत हेच स्पष्ट होत आहे.
मुंबईच्या महापौर किरोशी पेडणेकर यांनीही एएनआय या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना यासंदर्भातील माहिती दिली. 23 नोव्हेंबरला मुंबईतील शाळा सुरु होणार नसून कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहताच हा निर्णय़ घेण्यात आल्याचं त्या म्हणाल्या.
दरम्यन, राज्यात 23 नोव्हेंबरपासून अखेर नववी ते बारावीचे वर्ग सुरु होणार आहेत. पण, मुंबईतील परिस्थिती पाहता इथं मात्र शाळांचा लॉकडाऊन कायम असेल.