वीतभर पाण्यात मुंबई बुडाल्याचा कंठशोष करणारे तुंबलेल्या नागपूरवर गप्प का?: शिवसेना
मुंबईतल पाणीतुंबीच्या मुद्द्यावरून सत्ताधारी शिवसेनेवर टीकास्त्र सोडणाऱ्या विरोधकांना ठाकरे यांनी आपल्या शैलीत चिमटे काढले आहेत.
मुंबई: 'एरवी पावसामुळे मुंबईच्या केवळ सखल भागात वीतभर पाणी साचले तरी ‘मुंबई बुडाली होSS’ असा बेंबीच्या देठापासून कंठशोष करणारे वाचाळवीर आता कुठे आहेत? त्यांना कोणीतरी कंठसुधारक वटी नेऊन द्यायला हवी. मुंबई महापालिका आणि शिवसेनेविरुद्ध कोणाला कितीही ठणाणा करू देत, पण काही तासांच्या पावसात नागपूर का बुडाले? कोणामुळे बुडाले? विधिमंडळाचे अधिवेशन स्थगित करण्याइतकी नाचक्की का ओढवली, यावर मात्र आम्हाला काहीही म्हणायचे नाही!', असा सणसणीत टोला शिवसेना पक्षप्रामुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री आणि भाजपच्या धुरीणांना लगावला आहे.
'आम्हाला काहीही म्हणायचे नाही… नागपुरातील नाचक्की!'
'आम्हाला काहीही म्हणायचे नाही… नागपुरातील नाचक्की!' या मथळ्याखाली उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे मुखपत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दै. सामनामध्ये एक लेख लिहीला आहे. या लेखात मुंबईतल पाणीतुंबीच्या मुद्द्यावरून सत्ताधारी शिवसेनेवर टीकास्त्र सोडणाऱ्या विरोधकांना ठाकरे यांनी आपल्या शैलीत चिमटे काढले आहेत. ठाकरे यांचा रोख खास करून मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि भाजपवर दिसतो.
‘विकास पुरुष’लाही वेदना झाल्या असतील...
आपल्या लेखात ठाकरे म्हणतात. 'महाराष्ट्राची उपराजधानी पाण्यात बुडाली आहे. शुक्रवारी पहाटेपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने नागपूर शहराची दाणादाणच नव्हे तर दैना उडवली आहे. नागपुरात सध्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनाच्या निमित्ताने राज्याचे संपूर्ण सरकारच नागपुरात आले आहे. तथापि, विधान भवनातच पाणी शिरल्याने विधिमंडळाचे अधिवेशनच दिवसभरासाठी स्थगित करण्याची भयंकर नामुष्की सरकारवर ओढवली. दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कर्मभूमी असलेले नागपूर काही तासांच्या पावसाने जलमय झाले. आमदार निवास, मंत्र्यांचे बंगले, वीज उपकेंद्रे सारे काही पाण्यात आहे. अधिवेशनासाठी आलेले अधिकारी, कर्मचारी आणि प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींचेही अतोनात हाल झाले. आपल्या डोळ्यासमोर शहरात पाणी भरते आहे, रस्त्यांचे रूपांतर नद्यांमध्ये होत आहे, हे पाहून मुख्यमंत्रीही नक्कीच व्यथित झाले असणार.‘विकास पुरुष’ अशी ओळख असलेल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे हे शहर. आपल्या लाडक्या शहराची आज जी अवस्था झाली ती बघून धडाकेबाज गडकरींनाही निःसंशय वेदना झाल्या असणारच.
‘स्मार्ट’ शहरांच्या यादीत नागपूरला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार
दरम्यान, तुंबलेल्या गटारांनी नागपूरची परिस्थिती आणखी बिकट केली. अनेक ठिकाणी तर गटारांचे पाणी नागरिकांच्या घरातील टॉयलेटमधून बाहेर पडू लागले. आज राज्याचे मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस काही काळ नागपूरचे महापौर होते. त्या शहराचा एका पावसात असा बोजवारा उडालेला पाहून मुख्यमंत्री हळहळले असतील. पुन्हा महिन्यापूर्वीच नागपूर शहराला देशातील ‘स्मार्ट’ शहरांच्या यादीत प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. अशा ‘स्मार्ट’ शहराचे एका पावसात असे विद्रूपीकरण का झाले आणि त्याला जबाबदार कोण, यावर ‘चिंतन’ मात्र जरूर व्हायला हवे. नागपूर शहर हे भौगोलिकदृष्ट्या देशाचा केंद्रबिंदू तर आहेच, पण केंद्रीय सरकारचा राजकीय केंद्रबिंदूही नागपुरातच आहे. भारतीय जनता पक्षाची जननी असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय याच ठिकाणी आहे. केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. महाराष्ट्रातही भाजपचीच सत्ता आहे. शिवाय नागपूर महापालिकेतही भारतीय जनता पक्षाचेच कारभारी सत्तेच्या खुर्च्यांवर विराजमान आहेत. असे असतानाही पावसाच्या पाण्यामुळे देशातील हे ‘हाय प्रोफाईल’ शहर ठप्प झाले. तेथील जनजीवन कोलमडले, असेही ठाकरे यांनी आपल्या लेखात म्हटले आहे.