Uddhav Thackeray on CM Eknath Shinde: केंद्रीय निवडणूक आयोगाने 'शिवसेना' (Shiv Sena) हे नाव आणि 'धनुष्यबाण' हे पक्षचिन्ह मुख्यमंत्री शिंदेंना (CM Eknath Shinde) देण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शुक्रवारी सायंकाळी हा निर्णय जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी हा सत्याचा विजय असल्याचं म्हटलं. त्यानंतर शिंदेंनी शिवाजी पार्कमधील बाळासाहेबांच्या समाधीचं दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी ठाण्यामध्ये कार्यकर्त्यांनी केलेल्या सेलिब्रेशनला हजेरी लावली. तर दुसरीकडे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगावर टीका केली. आमचं निवडणूक चिन्ह चोरल्याचा दावा करताना उद्धव ठाकरेंनी आगामी काळामध्ये निवडणुका लागण्याची शक्यता व्यक्त केली.


कार्यकर्त्यांचा तुफान प्रतिसाद


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजही 'मातोश्री' या उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानाबाहेर त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे या समर्थकांशी बोलण्यासाठी उद्धव यांनी कलानगरच्या चौकात आले. त्यांनी ओपन जीपमधून कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी उद्धव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, निवडणूक आयोगाचे आयुक्त, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबरोबरच भारतीय जनता पार्टीवरही टीका केली. उद्धव ठाकरेंच्या भाषणादरम्यान कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करत होते. 'आदेश... साहेब आदेश...' असं अनेक कार्यकर्ते उद्धव ठाकरेंच्या भाषणादरम्यान ओरडत होते. 'उद्धव ठाकरे आगे बढो हम तुम्हारे साथ है', 'उद्धव ठाकरे अंगार है बाकी सब भंगार है' अशा घोषणाबाजीही कार्यकर्त्यांनी केली.


"ज्याच्या हातात धनुष्यबाण होता त्याचा चेहरा.."


भाषण देताना अचानक उद्धव ठाकरे घोषणाबाजी सुरु झाल्याने थांबले. त्यांनी निकालाच्या दिवशी घेतलेल्या पत्रकार परिषदेचा तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी धनुष्यबाण निशाण हाती घेऊन केलेल्या सेलिब्रेशनचा उल्लेख करत मुख्यमंत्र्यांना टोला लगावला. "तुम्ही कालचा फोटो पाहिला का ज्याच्या हातात धनुष्यबाण होता त्याचा आणि माझी प्रेस कॉन्फरन्स पाहिली का?" असा प्रश्न उद्धव यांनी समर्थकांना विचारला असता जमलेल्या गर्दीने एका सुरात 'हो' असा प्रतिसाद दिला. त्यानंतर उद्धव यांनी, "माझा चेहरा कसा होता आणि ज्याच्या हातात धनुष्यबाण होता त्याचा चेहरा कसा होता. ज्याच्या हातात धनुष्यबाण होता त्याच्या गळ्यात मी चोर आहे अशी पाटी लावल्यासारखा त्याचा चेहरा होता. ही चोरी त्याला पचवू द्यायची नाही," असा टोला मुख्यमंत्री शिंदेंचं थेट नाव न घेता लगावला.


"मी खचलेलो नाही..."


"धनुष्यबाण पेलायला सुद्धा मर्द लागतो. रावणाने सुद्धा शिव धनुष्य पेलायचा प्रयत्न केला होता पण काय झालं उताना पडला. चोर आणि चोरबाजाराचे मालक हा शिव धनुष्य पेलताना उताणे पडल्याशिवाय राहणार नाही," असंही उद्धव ठाकरे म्हणाले. त्याचप्रमाणे "मी खचलेलो नाही. मी खचणार नाही. माझी ताकद तुम्ही आहात. तुमच्या तकदीच्या जोरावर उभा आहे. ही ताकद माझ्यासोबत आहे तोपर्यंत असे कितीही चोर आणि चोरबाजाराचे मालक आले तरी त्यांना सगळ्यांना निवडणुकीमध्ये गाडून हा शिवरायांचा भगवा त्यांच्या छाताडावर फडकवण्याची ताकद आमच्या मनगटामध्ये आहे," असं म्हणत उद्धव यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी तयार राहा असं सांगितलं.