मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊतांच्या घरी सकाली EDची टीम पोहोचली आहे. पत्राचाळ प्रकरणी संजय राऊत यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. या घटनेनंतर महाराष्ट्राचं  वातावरण तापलं आहे. EDची टीम संजय राऊतांच्या घरी पोहोचल्यावर शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत. तर विरोधकांनी या कारवाईवरुन संजय राऊतांवर ताशेरे ओढले आहेत.  संजय राऊत यांना 101 टक्के अटक होणार असा दावा, झी24 तासशी बोलताना अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केला आहे. 


101टक्के राऊतांना अटक होणार - नवनीत राणा 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

''एखाद्या पत्रकाराकडे एवढी संपत्ती आली कुठून?, असा प्रश्न नवनीत राणा यांनी उपस्थित केला आहे. गोरगरीबांचे पैसे उकळून संजय राऊत यांनी आपली संपत्ती बनवली'' असा सणसणीत आरोप नवनीत राणा यांनी केला आहे. तर ''भ्रष्टाचारी संजय राऊतांविरोधात महाराष्ट्रातील जनता एकत्र लढेल'', असा इशाराही त्यांनी झी24 तासशी बोलताना दिला. 


जैसी करणी वैसी भरणी - शिरसाट


संजय राऊतांवरील कारवाईनंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. या कारवाईनंतर शिवसैनिकांमध्ये रोष आहे तर शिंदे गटातील आमदार मात्र या कारवाईचं समर्थन करताना दिसत आहेत. ''जैसी करणी वैसी भरणी, यामुळे या कारवाईतून कोणाची सुटका नाही'', असा इशारा संजय शिरसाट यांनी दिला आहे. तसंच ''एवढ्या मोठ्या प्रमाणात कारवाई पाहता संजय राऊत यांना अटक होऊ शकते'', असा दावाही शिरसाट यांनी केला आहे.  ''संजय राऊत यांच्या भोंग्यामुळे शिवसेना फुटली'', असा आरोपही शिरसाट यांनी केला आहे. ''संजय राऊत हे शिवसेनेत असले काय आणि नसले काय त्यामुळे आता शिवसेनेत काही फरक पडत नाही'', असा हल्लाबोल शिरसाट यांनी केला आहे. ''त्यांनी काही चुकीचं केलं नसलं तर घाबरण्याचं कारण नाही, पण इतर वेळची डायलॉगबाजी ही वेगळी असते, असाही टोला शिरसाठ यांनी लगावला आहे.


काय आहे पत्रा चाळ प्रकरण? 


गोरेगावमधील पत्रा चाळ पुनर्विकासासाठी गुरूआशिष कन्स्ट्रक्शनचा म्हाडासोबत करार
पत्राचाळीच्या ठिकाणी 3 हजारांहून अधिक फ्लॅट बांधायचे होते
एकूण फ्लॅटपैकी 672 फ्लॅट पत्रा चाळीतील रहिवाशांना दिले जाणार होते
उर्वरित फ्लॅट म्हाडा आणि गुरूआशिषकडे राहणार होते
बांधकाम न करता गुरूआशिष कन्स्ट्रक्शन कंपनीकडून म्हाडा आणि पत्रा चाळीतील रहिवाशांची फसणूक
गुरूआशिष कन्स्ट्रक्शनने ही जमीन 1 हजार 34 कोटींना दुस-या बिल्डरला विकली