मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना ईडी समन्स बजावणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या वसुलीचं टार्गेट दिल्याचे आरोप केले होते. या कथित आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी परमबीर सिंग यांचाही जबाब नोंदवला जाणार आहे. त्यासाठी ईडी हे समन्स परमबीर सिंग यांना बजवाणार असल्याची माहिती मिळतेय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर कथित 100 कोटी वसुलीचे आरोप केले आहेत. मुंबईतील बार, हॉटेल, रेस्टॉरंट मालकांकडून वसुली करण्याचं अनिल देशमुख यांनी सचिन वाझेला सांगितल्याचं परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं होतं. या आरोपांचा तपास सध्या ईडीकडून सुरु आहे. या पत्रामुळे अनिल देशमुख यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.


या प्रकरणाचा तपास सुरु असून ईडीने अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपुरातील घरं तसंच कार्यालयांवर छापे टाकले. अनिल देशमुख यांचे दोन सचिवही ईडीच्या कोठडीत आहेत. 


दरम्यान ईडी या प्रकरणात NIA च्या कोठडीत असलेल्या सचिन वाझे याचाही जबाब नोंदवणार आहे. कोर्टाने यासाठी ईडीला परवानगी दिली असून शनिवारी ईडीचे अधिकारी तळोजा कारागृहात जाऊन वाझेचा जबाब नोंदवतील. सचिन वाझे याची चौकशी पूर्ण होताच परमबीर सिग यांना ईडीचे अधिकारी समन्स पाठवून चौकशीसाठी बोलावणार असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.