मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत सन 2022 मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12 वी) परीक्षेची आवेदनपत्रे शुक्रवार 12 नोव्हेंबरपासून स्वीकारली जाणार आहेत. विद्यार्थ्यांनी www.mahahsscboard.in  या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने आवेदनपत्र भरावीत, असं आवाहन शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या परीक्षेस नियमित, पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी तसंच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय, आयटीआय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. यामध्ये उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत शास्त्र, कला व वाणिज्य शाखांची फक्त नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे SARAL डाटाबेसवरून नियमित शुल्कासह 12 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2021 या कालावधीत भरावयाची आहेत. 


तर उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत व्यवसाय अभ्यासक्रम शाखेचे नियमित विद्यार्थी, पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी, श्रेणी सुधार व तुरळक विषय घेऊन परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थी, आयटीआयद्वारे ट्रान्स्फर ऑफ क्रेडिट घेणारे विद्यार्थी यांची आवेदनपत्रे प्रचलित पद्धतीप्रमाणे शुक्रवार 3 डिसेंबर ते 11 डिसेंबर 2021 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने भरावयाची आहेत. 


विलंब शुल्कासह हे अर्ज 13 डिसेंबर ते 20 डिसेंबर 2021 या कालावधीत भरता येतील. तर, उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांनी बँकेत चलनाद्वारे शुल्क भरावयाचा कालावधी 12 नोव्हेंबर ते 23 डिसेंबर 2021 असा आहे.


उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या व प्री लिस्ट मंगळवार 28 डिसेंबर 2021 रोजी जमा करावयाची आहे, असं महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी कळविले आहे.