Eknath Shinde and Devendra Fadnavis' bungalow expenses : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर झालेल्या खानपानाच्या वारेमाप खर्चावरील टीकेनंतर आता पाहुणचारावरील खर्चाला कात्री लावण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. वर्षा बंगल्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवास्थानावरील खर्चही आटोक्यात ठेवला जाणार आहे. वर्षावरील खानपानावरुन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अधिवेशनात आवाज उठवताना जोरदार टीका केली होती. यावेळी वर्षावरील खानपानावरुन  अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात कलगीतुरा रंगला होता. मात्र, अजितदादांच्या टीकेनंतर सरकारला एक पाऊल मागे घ्यावे लागले आहे. तातडीने खर्चावर नियंत्रण आणण्याबाबत हालचाली केल्यात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 आता मुख्ममंत्र्यांचा वर्षा बंगला आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सागर बंगल्यावरील खानपानाचे कंत्राट दोन वेगवेगळ्या खासगी कंत्राटदारांना देण्यात आले आहे. तसेच दोन्ही निवासस्थानावरील खानपानासाठी वर्षाला 5 कोटी रुपयांचा खर्चही मर्यादित करण्यात आला आहे. या निर्णयानुसार वर्षा निवासस्थानी श्री सुखसागर हॉस्पिटॅलिटी, तर सागर निवासस्थानी खानपान सेवा पुरवण्यासाठी मे. छत्रधारी कॅटरर्सला कंत्राट देण्यात आले आहे. 


कात्री लावण्यात आलेल्यांमध्ये साधारण पदार्थांच्या यादीत 44 पदार्थांचा समावेश आहे, तर विशेष पदार्थांच्या यादीत 29 पदार्थ आहेत. वेफर्स, मसाला चहा, कॉफी व ग्रीन टी, कोथिंबीर वडी, समोसा, उकडीचे मोदक, स्पेशल पेढा, शाकाहारी आणि मांसाहारी बफेट यांच्या यात समावेश आहे.


मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या निवासस्थानी कोणते पदार्थ मिळणार?  


- मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या पाहुण्यांसाठी साधारण व विशेष पदार्थांची यादी तयार करण्यात आली आहे


- साधारण पदार्थांच्या यादीत 44 पदार्थांचा समावेश आहे, तर विशेष पदार्थांच्या यादीत 29 पदार्थ आहेत


- साधारण पदार्थांमध्ये सर्वात स्वस्त पदार्थ वेफर्स असून त्यासाठी कंत्राटदारास फक्त 10 रुपये मिळणार आहेत


- विशेष पदार्थांमध्ये मसाला चहा, कॉफी व ग्रीन टी ही सर्वात स्वस्त असून त्यासाठी फक्त 14 रुपये, तर मसाला दुधासाठी 15 रुपये मोजावे लागणार आहेत


- विशेष पदार्थांमध्ये खाण्यासाठी कोथिंबीर वडी, समोसा, उकडीचे मोदक, स्पेशल पेढा हे सर्वात स्वस्त म्हणजे 15 रुपयांत दिले जाणारे पदार्थ असतील


- महत्त्वाची बाब म्हणजे साधारण व विशेष वर्गवारीत सर्वात महाग हे शाकाहारी आणि मांसाहारी बफेट आहेत


- साधारण पदार्थांमध्ये शाकाहारी बफेटसाठी 160 रुपये, तर मांसाहारी बफेटसाठी 175 रुपये आकारले जातील


- विशेष पदार्थांच्या यादीत स्पेशल शाकाहारी बफेट 325 रुपयांना, तर मांसाहारी बफेट 350 रुपयांत उपलब्ध करून दिला जाईल.