Eknath Shinde Sharad Pawar Meeting : आगामी विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. त्यातलीच एक आणि बहुचर्चित अशी घडामोड म्हणजे एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्यातील भेट. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे सर्वेसर्वा खुद्द शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात घडलेल्या भेटीनं सर्वांच्या नजरा वळवल्या. अवघ्या 10 दिवसांच्या अंतरावर ही दोन्ही नेतेमंडळी दोनदा भेटली आणि त्यांच्या या भेटीमागचं, बैठकीमागचं नेमकं सत्य काय? हाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करून गेला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इथं भेटींची चर्चा सुरू असतानाच आता तिथं, या भेटीसंदर्भातील एक मोठी माहिती समोर आली आहे. ही माहिती म्हणजे पवार- शिंदे भेटीचं अदानी कनेक्शन. सूत्रांच्या माहितीनुसार पवार आणि शिंदे यांच्या भेटीचं अदानी कनेक्शन नुकतंच समोर आलं असून, या बैठकीमध्ये उद्योगजक गौतम अदानी यांच्या धारावी पुनर्वसन प्रकल्पाशी संलग्न तीन बड्या अधिकाऱ्यांचीही वर्षा बंगल्यावर उपस्थिती होती. 


त्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमागचं नेमकं कारण काय? 


मुख्यमंत्री शिंदे आणि शरद पवार यांच्याधील या भेटीदरम्यान अदानी समुहाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती अनेकांच्या भुवया उंचावून गेली असली तरीही हे अधिकारी नेमके या भेटीदरम्यान खरंच उपस्थित होते का? त्यांच्यामध्ये नेमकी काय चर्चा झाली? या प्रश्नांसमवेत इतर तपशील अद्याप समोर येऊ शकलेला नाही. 


हेसुद्धा वाचा : ब्लू प्रिंट बनवण्यापेक्षा ब्लू फिल्म बनवली असती तर तुम्ही पाहिली तरी असती! राज ठाकरेंची फटकेबाजी


 


दरम्यान या भेटीमध्ये मुंबईतील धारावी पुनर्वसनाच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळं याच संबंधी या अधिकाऱ्यांची उपस्थिती असू शकते असा तर्क लावला जात आहे. 


धारावी पुनर्वसनाचा प्रकल्प अदानींच्या वाट्याला गेल्यामुळे  प्रकल्पाबाबत बरेच वाद सुरू आहेत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना, काँग्रेस पक्षानंही अदानींच्या सहभागाला जोरदार विरोध केल्याचं पाहायला मिळालं आहे. दरम्यानच्या काळात पवारांच्या निवासस्थानी खुद्द गौतम अदानी यांचीसुद्धा उपस्थिती काही प्रसंगी पाहायला मिळाली आहे. त्यामुळं आता या भेटीशी अदानी कनेक्शन जाणू इच्छिणाऱ्यांनी योगायोग जोडण्यास सुरुवात केली आहे असं म्हणणं गैर ठरणार नाही.