एल्फिन्स्टन चेंगराचेंगरी : रेल्वे स्थानक ऑडिट रिपोर्टमध्ये या महत्वाच्या सूचना
पश्चिम रेल्वेच्या दुहेरी बाजूने वाहतूक चालणाऱ्या प्लॅटफॉर्मवरील उपहारगृह आणि स्वच्छतागृहे स्थानक परिसरातील अन्य सार्वजनिक ठिकाणी स्थलांतरित करण्याची सूचना ऑडिट समितीने केली आहे.
मुंबई : पश्चिम रेल्वेच्या दुहेरी बाजूने वाहतूक चालणाऱ्या प्लॅटफॉर्मवरील उपहारगृह आणि स्वच्छतागृहे स्थानक परिसरातील अन्य सार्वजनिक ठिकाणी स्थलांतरित करण्याची सूचना ऑडिट समितीने केली आहे.
एल्फिन्स्टन रोड पुलावरील दुर्घटनेनंतर पश्चिम रेल्वेतील विविध विभागांच्या अधिकाऱ्यांचा समावेश असणाऱ्या ऑडिट समितीने नेमलेल्या दिलेल्या अहवालात प्लॅटफॉर्म परिसर मोकळा ठेवण्यावर भर दिला आहे.
तसेच स्थानकांमधील अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढविण्याचीही महत्त्वाची सूचना केली आहे. त्याचप्रमाणे पश्चिम रेल्वे स्थानकातील सीसीटीव्हींची संख्या सध्याच्या १०६० वरुन २७२९ पर्यंत नेण्याचीही महत्त्वाची शिफारस करण्यात आली.
रेल्वे प्लॅटफॉर्मवर दुहेरी बाजूने वाहतूक होणारे प्लॅटफॉर्म आणि ज्या प्लॅटफॉर्मवर प्रवाशांना थेट प्रवेश करता येतो अशा तऱ्हेची विभागणी असते. त्यातील दुहेरी बाजूने प्लॅटफॉर्मवरील उपहारगृहे आणि स्वच्छतागृहे स्थानक परिसरात अन्यत्र नेल्यास हा भाग प्रवाशांना ये-जा करणे अधिक सुलभ होईल, असे मत व्यक्त करण्यात आले आहे.
ज्या प्लॅटफॉर्मवर दोन्ही बाजूने आणि दोन्ही दिशेने गाड्यांची वाहतूक होणाऱ्या प्लॅटफॉर्मवर स्वच्छतागृहे आणि उपहारगृहांमुळे प्रवाशांना बरीच अडचण वाढत असल्याचा अनुभव आहे. त्यामुळे या दोन्ही गोष्टी अन्यत्र हलविण्याची महत्वाची सूचना या अहवालात करण्यात आलेय, अशी सूत्रांकडून माहिती देण्यात आली.