Hole In Delhi Mumbai Expressway: दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेसंदर्भातील एक विचित्र प्रकार सध्या चांगलाच चर्चेत आहे. भारताची राजधानी आणि आर्थिक राजधानीला जोडणाऱ्या या रस्त्यावरील एका भल्या मोठ्या भगदाडाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दुचाकीचं संपूर्ण चाक अडकून पडेल एवढ्या मोठ्या मानवी आकाराच्या खड्ड्यासंदर्भात विचित्र दावा या रस्त्याचं काम करणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्याने केला आहे. हा खड्डा उंदारांमुळे पडल्याचा दावा कर्मचाऱ्याने केला आहे. आता या कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आलं आहे. हा सारा प्रकार राजस्थानमधील दौसा जिल्ह्यात घडला आहे.


कंपनीने लिहिलं पत्र


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केसीसी बिल्डकॉन कंपनी येथील रस्त्याच्या बांधकामाचं काम पाहतेय. या कंपनीमध्ये मेंटेनन्स मॅनेजर असलेल्या कर्मचाऱ्याने हा खड्डा पडल्यानंतर खड्डा उंदरांनी रस्ता पोखरल्याने पडल्याचा दावा केला. हा प्रकार समोर आल्यानंतर सदर कंपनीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला (एनएचएआय) पत्र लिहून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. रस्त्याला उंदरांनी पोखरल्याने भगदाड पडल्याची प्रतिक्रिया नोंदवणारा कर्मचारी हा फारच कनिष्ठ असल्याचं कंपनीने पत्रात म्हटलं आहे.


कंपनीचं म्हणणं काय?


उंदरांनी मुंबई-दिल्ली एक्सप्रेस-वे पोखरल्याचा दावा करणाऱ्या कर्मचाऱ्याला या विषयातील फारसं तांत्रिक ज्ञान नसल्याचं बांधकाम करणाऱ्या कंपनीने एनएचएआयला सांगितलं आहे. तसेच या प्रकरणामध्ये कर्मचाऱ्याला कंपनीने कामावरुन काढून टाकल्याचंही कंपनीने सांगितलं आहे. "तो कर्मचारी देखभाल करणारा व्यवस्थापक नाही. तांत्रिक माहिती घेऊन त्याने प्रतिक्रिया दिलेली नाही," असा उल्लेख कंपनीच्या पत्रात आहे. 


कर्मचाऱ्याने काय म्हटलेलं?


"उंदीर किंवा एखाद्या प्राण्याने पोखरुन रस्त्यावर मोठं छिद्र केलं. त्यानंतर त्यामध्ये पाणी गेल्याने त्याचा आकार वाढाला," अशी प्रतिक्रिया या कर्मचाऱ्याने नोंदवली होती. मात्र आता हा कर्मचारी कोणत्याही पदावर नव्हता आणि त्याला तांत्रिक ज्ञान नाही असं कंपनीने सांगितलं आहे. या साऱ्या गोंधळानंतर येथील बांधकामावर देखरेख करण्यासाठी कंपनीने नेमलेले प्रकल्प निर्देशक बलदेव यादव यांनी पाणीगळती झाल्याने रस्त्यावर भगदाड पडल्याचं सांगितलं आहे. भगदाड पडल्याची माहिती मिळाल्यानंतर तातडीने येथे बॅरिकेट्स टाकून रस्ता बंद करुन डागडुजी करण्यात आल्याचंही यादव यांनी म्हटलं आहे. 



देशातील सर्वाधिक लांबीचा एक्सप्रेस-वे


मुंबई-दिल्ली एक्सप्रेस-वे हा एकूण 1386 किलोमीटर लांबीचा असून हा देशातील सर्वाधिक लांबीचा एक्सप्रेस-वे आहे. दोन्ही महत्त्वाच्या शहरांमधील प्रवासाचा कालावधी 24 तासांवरुन 12 तासांवर यावा या उद्देशाने सदर रस्त्याची निर्मिती आणि रचना करण्यात आली आहे. हा एक्सप्रेस-वे हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरा आणि महाराष्ट्रातून जातो. 


80 टक्के काम पूर्ण


31 जुलै रोजी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई-दिल्ली एक्सप्रेस-वे प्रकल्पाचं 80 टक्के काम पूर्ण झालं आहे. संपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अजून एक वर्ष लागणार असल्याचं सांगितलं जात आहे.